जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे दोन्ही पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे मात्र अवसान गळाले आहे. दोन वर्षांच्या शिक्षेमुळे मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आल्याचा मोठा फटका जिल्ह्यातील पक्षाला बसला आहे.
नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून जिल्ह्यात मेळाव्यांसह बैठकांचा सपाटा लावण्यात आला होता. त्यातही भाजपसह शिवसेनेचा शिंदे गट आघाडीवर असताना, राष्ट्रवादीचा अजित पवार गट खूपच मागे होता. पक्षाकडून रावेरसह जळगावसाठी दोन मेळावे घेण्याचे निश्चित झाल्यानंतरही ऐनवेळी तारखेत बदल करण्याची नामुष्की ओढवली होती आणि त्यास कारणीभूत ठरले होते माणिकराव कोकाटे.
जळगाव जिल्ह्याचे संपर्कमंत्री असलेले कोकाटे उपस्थित राहू न शकल्याने मेळावे रद्द करण्याची वेळ पक्षावर आली होती. कोकटेंनी वेळ दिल्यानंतर अखेर उशिरा घाईगर्दीत दोन्ही ठिकाणचे मेळावे आटोपले असले, तरी त्यातून फार काही नंतर साध्य झाले नाही. जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुका लढताना भाजप-शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार गटाची ताकद खूपच कमी पडली.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावली असताना, अजित पवार गटात प्रभावी नेतृत्वाअभावी खूपच गोंधळाची स्थिती दिसून आली. संपर्कमंत्री माणिकराव कोकाटे मेळावे घेतल्यानंतर जिल्ह्यात फारसे फिरकले नाहीत.
अमळनेरमधील एकमेव आमदार अनिल पाटील हे माजी मंत्री आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. प्रत्यक्षात, त्यांचा प्रभाव अमळनेर वगळता कुठेच दिसून आला नाही. अजित पवार गटात अलिकडेच शरद पवार गटातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर तसेच विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे या काही मातब्बरांनी प्रवेश केला आहे. मात्र, संबंधितांनाही जिल्ह्यात आपल्या पक्षाचा दबदबा निर्माण करता आला नाही. आताही जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट फार आक्रमक दिसून आलेला नाही.
कोकाटे नसल्याने काय फरक ?
जळगाव महापालिकेच्या जास्तीतजास्त जागा जिंकून निर्विवाद सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप ७५ पैकी जवळपास ६० जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत, भाजप देईल तेवढ्या जागा पदरात पाडून घेण्याची वेळ महायुतीचे घटक पक्ष शिंदे गटासह अजित पवार गटावर आली आहे. दरम्यान, भाजपशी जागा वाटपाबाबत वाटाघाटी करण्यासाठी शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र, अजित पवार गटाकडून भाजपशी वाटाघाटी करण्याकरीता कोणी पुढे व्हावे, यावरूनच अद्याप खल सुरू आहे. पक्षाचे संपर्कमंत्री माणिकराव कोकाटे असते तर कदाचित कोणतीच अडचण आली नसती. मात्र, आता कोकाटेंच्या गैरहजेरीत मनपासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होण्यापूर्वी अजित पवार गटाला भाजप नेते गिरीश महाजन किंवा इतरांशी बोलणे करून जागा वाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे.
