जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे नेते लोकसभेसह विधानसभेप्रमाणे युती होणार असल्याचे सांगत आहेत. परंतु, स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाचा किरकोळ पदाधिकारी अलीकडे स्वबळाची भाषा करताना दिसत आहे. दुसरीकडे, जळगाव महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने ठाकरे गटाच्या तब्बल १५ दिग्गजांचे घाऊक प्रवेश घडवून आणल्याने शिंदे गटासह अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.

जळगाव महापालिकेच्या २०१८ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करून परस्परविरोधी जोरदार लढत दिली होती. प्रत्यक्षात, भाजपने त्या वेळी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात सर्वाधिक जागा जिंकत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, अडीच वर्षानंतर शिवसेनेला भाजपचे काही नगरसेवक आपल्या गटात सामील करून घेत सत्तेचा तोल आपल्या बाजूने वळविण्यात यश आले. मोठे बहुमत असताना भाजपला नंतरचे अडीत वर्षे हात चोळत बसावे लागले. त्यावेळी घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे भाजप नेते मंत्री महाजन तसेच आमदार सुरेश भोळे यांना मोठा धक्का बसला होता. कारण, निवडणुकीदरम्यान महाजन आणि भोळे यांनी जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते; परंतु अडीच वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता म्हणावी तशी करता आली नव्हती.

त्यावेळी घडलेल्या संपूर्ण राजकीय उलथापालथीत ठाकरे गटाचे महापालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली होती. भाजपचे काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात येताच सत्तेचा पलडा शिवसेनेच्या बाजूने झुकला आणि त्यानंतर जयश्री महाजन (सुनील महाजन यांच्या सौभाग्यवती) यांची जळगावच्या महापौरपदी निवड झाली. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही महाजन परिवाराने भाजपसाठी मोठे राजकीय आव्हान उभे केले. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर जयश्री महाजन आणि भाजप आमदार सुरेश भोळे यांच्यात थेट, चुरशीची आणि लक्षवेधी लढत रंगली. ही स्थिती लक्षात घेता जळगावमध्ये ठाकरे गटाकडून प्रत्येक वेळी होणारा कडवा मुकाबला कायमचा थांबविण्यासाठी मंत्री महाजन आणि आमदार भोळे यांनी मोठी खेळी आता खेळली आहे.

सध्या ठाकरे गटात असलेल्या माजी मंत्री सुरेश जैन समर्थक दोन माजी महापौरांसह डझनभर माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत बहुमत असतानाही काही नगरसेवकांमुळे भाजपच्या हातून सत्ता गेली होती. त्यात विधानसभा निवडणुकीत काही नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी फुटलेल्या आणि बंडखोरी करणाऱ्यांसाठी अद्याप भाजपने दारे उघडलेली नाहीत. तूर्त संबंधितांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे. महाजन यांनी फुटलेल्यांसह बंडखोरांना पुन्हा जवळ घेतले आणि ठाकरे गटातून नव्याने आलेल्या सर्व १५ माजी नगरसेवकांना उमेदवारी दिल्यास महापालिकेच्या ७५ जागा एकट्या भाजपला लढवाव्या लागतील. शिंदे गटासह अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.