जळगाव : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी भरधाव वेगाने धावणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (२९) किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग करून आकाशवाणी चौकात पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगला माळी या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मुलगा भरत याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी निघाल्या होत्या. शहरातील महामार्गावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की मायलेक रस्त्यावर फेकले गेले. मंगला माळी या रस्त्यावर कोसळताच टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
टँकर चालकाचा पलायनाचा प्रयत्न
अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात पाहिलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ टँकरचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नागरिकांच्या धाडसामुळे चालकाचा पलायनाचा प्रयत्न फसला.
रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. या वेळी मंगला माळी यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
भरधाव वाहनांवर कारवाईची मागणी
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावरुन धावणाऱ्या भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. महामार्गावर पोलिसांकडून वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि बेदरकार वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. निष्पाप कष्टकरी महिलेचा बेफिकीर वाहनचालकामुळे झालेला मृत्यू अत्यंत संतापजनक असून दोषी चालकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
