जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला राजकीय पक्षांकडूनही गांभीर्याने घेतले जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची नियुक्ती केली असून, जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांचाही त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत दोन माजी मंत्र्यांसह माजी आमदार आणि पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी एसआयआर कार्यक्रमासाठी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये समन्वयक नियुक्त केले आहेत. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण, त्यातील आवश्यक दुरुस्त्या, मतदारांची नोंदणी तसेच मतदार याद्यांशी संबंधित प्रक्रियेवर पक्षाच्या पातळीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समन्वयकांवर सोपविण्यात आली आहे.

खान्देशातही पक्षाची तयारी

नवीन नियुक्त्यांमध्ये खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ११, धुळे जिल्ह्यातील पाच आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार मतदारसंघांसाठी पक्षाने स्वतंत्र समन्वयक नेमले आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक लक्षात घेऊन विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक तयारीला वेग देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

कोणाकडे कोणती जबाबदारी?

जळगाव जिल्ह्यात चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार कैलास पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रावेर मतदारसंघाची जबाबदारी भगतसिंग पाटील यांच्याकडे, भुसावळसाठी उमेश नेमाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव शहर मतदारसंघासाठी प्रतिभा शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमळनेर मतदारसंघासाठी विक्रांत पाटील, तर एरंडोल मतदारसंघासाठी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्याकडे समन्वयकपद देण्यात आले आहे. चाळीसगावसाठी योगेश देसले, पाचोऱ्यासाठी अभिलाषा रोकडे, जामनेरसाठी नरेंद्र जंजाळ आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. सोपान दुट्टे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन माजी मंत्र्यांवर महत्त्वाची जबाबदारी

जळगाव जिल्ह्यातील नियुक्त्यांमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील या दोन अनुभवी नेत्यांचा समावेश विशेष लक्षवेधी ठरला आहे. दोन्ही नेत्यांना अनुक्रमे जळगाव ग्रामीण आणि एरंडोल मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मतदार याद्यांच्या प्रक्रियेसोबतच स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेशी समन्वय साधण्याचे आव्हानही या नेत्यांसमोर असणार आहे.

मतदार यादीला राजकीय महत्त्व

एसआयआरची प्रक्रिया ही प्रशासनाच्या पातळीवर राबविली जात असली तरी मतदार यादीतील नावे, नवीन मतदारांची नोंदणी, स्थलांतरित मतदार तसेच दुबार किंवा चुकीच्या नोंदी यासंदर्भातील बाबींवर राजकीय पक्षही लक्ष ठेवतात. त्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांच्या नियुक्तीला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभेची ‘रंगीत तालीम’ म्हणून नियुक्त्यांकडे पाहिले जात असले तरी सध्या या समन्वयकांची मुख्य जबाबदारी एसआयआर प्रक्रियेच्या काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची आहे. मतदार याद्यांमध्ये पात्र मतदारांची नोंद राहावी आणि प्रक्रियेत आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत व्हाव्यात, यासाठी पक्षाच्या पातळीवर समन्वय साधण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

संघटनात्मक हालचालींना वेग

राज्यातील विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी राजकीय पक्षांकडून मतदारसंघनिहाय संघटनात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने एसआयआरच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र समन्वयक नियुक्त केल्याने पक्षाने स्थानिक पातळीवर कामाला सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत. आता नियुक्त समन्वयक प्रत्यक्ष मतदारसंघात कितपत सक्रिय होतात आणि एसआयआरच्या कामातून पक्षाच्या संघटनात्मक तयारीला किती बळ मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.