जळगाव : राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या पक्षांतराच्या घडामोडींनी वेग घेतला असून, शिवसेना ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षालाही मोठे खिंडार पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या राजकीय घडामोडींना ‘ऑपरेशन तुतारी’ असे नाव देण्यात आले असून, त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अर्धिअधिक राष्ट्रवादी रिकामी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही खासदार नसला तरी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजकीय भविष्याचा अंदाज घेत असून, सत्ताधारी पक्षांकडे झुकत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीच अनेक दिग्गजांनी सोडली साथ

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील तसेच दिलीप सोनवणे यांनी शरद पवार गटाची साथ सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संबंधितांच्या प्रवेशांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळही उडाली होती. प्रत्यक्षात त्यानंतर संबंधितांना अपेक्षित राजकीय संधी मिळाल्या नसल्याची चर्चा असून, त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये अपेक्षित बदलही घडले नाहीत.

अजितदादांच्या निधनानंतर समीकरणे बदलली

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रमुख अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेगळे वळण मिळाले. नेतृत्वातील निर्माण झालेल्या पोकळीमुळे अनेक इच्छुकांना अपेक्षित राजकीय स्थान मिळू शकले नाही. परिणामी, शरद पवार गट सोडण्याच्या तयारीत असलेल्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सावध भूमिका घेतल्याचे बोलले जाते. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे अनेकांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय पुढे ढकलल्याचे किंवा रद्द केल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जाते.

भाजप आणि शिंदे गटाकडे वाढला कल?

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजित पवार गटात जाण्यापेक्षा भाजप किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास अधिक राजकीय संधी मिळू शकते, असा अंदाज अनेक इच्छुक नेत्यांकडून व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही प्रभावी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क वाढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शरद पवार गटासमोर मोठे आव्हान

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची संघटना आधीच कमकुवत झाल्याचे मानले जाते. अशातच आणखी काही प्रभावी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यास जिल्ह्यातील अर्धीअधिक संघटना रिकामी होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संभाव्य पक्षांतराबाबत कोणत्याही नेत्याने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या राजकीय वर्तुळापुरत्याच मर्यादित आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच या घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही.