जळगाव : राज्यात सध्या पुनरिक्षणाच्या माध्यमातून मतदार यादी निर्दोष करण्याचे काम सुरु असून, त्या आधारे आगामी काळात लोकसभेसह विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन आणखी काही मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातही विशेषतः विधानसभेचे चार ते पाच मतदारसंघ वाढण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

राज्यभर सध्या मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण सुरू असून निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी येऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. त्या माध्यमातून काही नावे वगळली जाणार असून, निर्दोष मतदार यादी तयार झाल्यावर पुढील लोकसभा निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे देशातील खासदारांची संख्या ५४३ वरून ६५० होईल, महाराष्ट्रातही विधानसभेचे जवळपास ६२ मतदारसंघ वाढून आमदारांची संख्या २८८ वरून ३५० पर्यंत जाईलल, असे वक्तव्य भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही केले आहे. यामुळे लोकसभेसह विधानसभेच्या आगामी निवडणुकांपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या हालचाली सुरु होण्याच्या चर्चेला नवे बळ मिळाले आहे.

२००८ च्या पुनर्रचनेनंतर बदल नाही

जळगाव जिल्ह्यात सद्यःस्थितीत दोन लोकसभा आणि ११ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत. जिल्ह्यातील १५ पैकी आठ तालुके जळगाव लोकसभा मतदारसंघात, तर सात तालुके रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ होतात. या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग रावेरला जोडलेला आहे. जिल्ह्यात सध्या १५ तालुके असले, तरी विधानसभेचे मतदारसंघ फक्त ११ आहेत. चार विधानसभा मतदारसंघ तर दोन तालुके मिळून तयार झाले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता एकापेक्षा जास्त तालुके मिळून तयार झालेल्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना लोकसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता बळावली आहे. २००८ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आजतागायत ११ मतदारसंघात कोणताही बदल झालेला नाही. साहजिक, बऱ्याच तालुक्यांच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. मोठ्या मतदारसंघातील शेवटच्या गावापर्यंत पोहचण्यात आमदारांनाही मर्यादा आल्या आहेत.

प्रस्थापितांची होणार अडचण

जळगाव जिल्ह्यात सध्याच्या घडीला जळगाव शहरासह जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल-रावेर, भुसावळ, जामनेर, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर, हे ११ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत. नव्याने मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास रावेर-यावलचे विभाजन होऊन यावल हा स्वतंत्र मतदारसंघ तयार होऊ शकेल. तसेच एरंडोल-पारोळामधून एरंडोल, जळगाव ग्रामीणमधून धरणगाव, पाचोरा-भडगावमधून भडगाव हे तालुके वेगळे होतील. आणि नवीन मतदारसंघांची निर्मिती केली जाईल. याशिवाय, जळगाव शहरातून आणखी एक अतिरिक्त मतदारसंघ तयार होईल. अशा प्रकारे जिल्ह्यात जवळपास पाच नवीन विधानसभा मतदारसंघ नव्याने तयार होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आगामी काळात राजकीय समीकरणेही बदलणार असून, प्रस्थापितांना आपल्या सोयीचा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. विशेष म्हणजे मतदारसंघांची संख्या वाढल्याने आणखी काही नवीन चेहऱ्यांना विधानसभेवर पोहचण्याची संधी मिळू शकणार आहे.