जळगाव : शहराबाहेरुन गेलेल्या पाळधी ते तरसोद बायपासदरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर इतर चार जण जखमी झाले. या अपघातानंतर जळगाव तालुका पोलिसांनी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या जबाबदार संचालकांसह साइट अधिकाऱ्यांविरुद्ध सोमवारी रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पाळधी ते तरसोददरम्यानच्या बायपास महामार्गासह रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम इंदूर येथील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीने केले आहे. हे काम ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण झाले होते. करारातील अटींनुसार पुढील तीन वर्षे रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे. प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कंपनीकडून या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्ती करताना एका बाजूची वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली. अशा परिस्थितीत वाहनचालकांना दुरुस्तीचे काम सुरू असल्याची स्पष्ट कल्पना देण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करणे अपेक्षित होते.
मात्र, पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दुरुस्तीच्या ठिकाणी काम सुरू आहे. वाहने हळू चालवा, याकडे लक्ष वेधणारे फलक, बॅरिकेट किंवा रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सावध करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले नव्हते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात दुरुस्तीचे ठिकाण वाहनचालकांच्या लक्षात येणे कठीण झाले होते, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बायपासवरील दुरुस्ती सुरू असलेल्या लेनमध्ये ट्रक आणि मोटारीची जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणारे शांताराम केशव पाटील (५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामचंद्र महाजन, ईश्वर महाजन यांच्यासह अन्य प्रवासी या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस अंमलदार अजय भोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसांनी अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी. एम. दत्ता तसेच संबंधित साइट अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, २९०, ३(५), मोटार वाहन कायदा कलम १९८-अ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवण्यात आली असल्यास वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी स्पष्ट सूचना फलक, बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, ब्लिंकर्स आणि आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करणे गरजेचे असते. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनांची वेगमर्यादा आणि कमी दृश्यमानता लक्षात घेता या सुरक्षा उपायांना अधिक महत्त्व असते. मात्र, बायपासवर सुरक्षा उपायांचा अभाव असल्याचा आरोप पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
