जळगाव : जिल्ह्यातील पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूलाचा भराव मुसळधार पावसामुळे खचल्याच्या घटनेने महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे वाहतूक अद्याप बंद असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. घटनेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. रस्त्याचा भराव नेमका कशामुळे खचला, पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला होता का, तसेच बांधकामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे का, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती मागविली.

गुणवत्तेवर गंभीर प्रश्न

विशेष म्हणजे, हा बाह्यवळण महामार्ग नुकताच तयार झाला असून पहिल्याच मोठ्या पावसात त्याचा काही भाग खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. महामार्गाच्या कामादरम्यानही काही नागरिक व स्थानिकांकडून विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या वेळी त्याकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नसल्याची चर्चा आहे. आता प्रत्यक्ष नुकसान समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

चौकशीनंतरच पुढील कारवाई

पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती दिली. चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, तसेच महामार्गाची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक बंद; नागरिकांची गैरसोय

रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अद्याप बंद असून जड वाहने आणि इतर वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि खर्च वाढत असून स्थानिक नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित

या पाहणीवेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तांत्रिक माहिती सादर करत दुरुस्तीच्या प्रस्तावित उपाययोजनांची माहिती मंत्र्यांना दिली.