जळगाव : शहरालगतच्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरील गिरणा नदी पुलाजवळ शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. काचेच्या बाटल्यांनी भरलेला कंटेनर अचानक कलंडल्याने मागून येणाऱ्या सहा वाहनांची एकमेकांवर धडक झाली. या अपघातात सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एका ट्रकचालकास दुखापत झाली आहे. अपघातामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाळधीकडून तरसोदकडे काचेच्या बाटल्यांचा माल घेऊन कंटेनर जात होता. नवीन बायपास महामार्गावरील गिरणा नदी पुलाजवळील मोकळ्या रस्त्यावर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरचा वेग अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, संतुलन बिघडल्याने कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी आडवा कलंडला. या घटनेनंतर कंटेनरमधील काचेच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर विखुरले गेले. मोठ्या प्रमाणावर काचा फुटल्याने रस्त्यावर काचेचा खच तयार झाला. कंटेनर अचानक आडवा झाल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना वेळीच ब्रेक लावता आले नाहीत. परिणामी एकामागून एक अशी सहा वाहने एकमेकांना धडकली. या साखळी अपघातात काही कार, मालवाहू ट्रक व हलक्या व्यावसायिक वाहनांचा समावेश असल्याची माहिती आहे. काही वाहनांच्या समोरील भागाचे अतोनात नुकसान झाले असून काचा फुटणे, बोनट दुमडणे व इंजिनला धक्का बसल्याचे दिसून आले. अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र, एका ट्रकचालकाला दुखापत झाली आहे.
तातडीने पोलीस व मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच महामार्ग वाहतूक शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवून सुरक्षितता उपाययोजना केल्या. अपघातग्रस्त वाहनांमधील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जखमी कंटेनर चालकाला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. क्रेनच्या साहाय्याने कलंडलेला कंटेनर सरळ करून बाजूला करण्यात आला. तसेच अपघातग्रस्त इतर वाहनेही रस्त्याच्या कडेला हलविण्यात आली. रस्त्यावर विखुरलेल्या काचेच्या बाटल्या व बॉक्स हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सफाई मोहीम राबविण्यात आली. काचा पसरल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यास अडथळे येत होते.
स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार
अपघाताची माहिती परिसरात समजताच अनेक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी पोलिसांना वाहने हटविण्यास व रस्ता मोकळा करण्यास मदत केली. रात्रीची वेळ, अपुरी प्रकाश योजना आणि रस्त्यावर पसरलेल्या काचा यामुळे मदतकार्य आव्हानात्मक ठरत होते; तरीही पोलिस व स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.
अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही प्रवाशांना जवळपास तासभर अडकून पडल्याने गैरसोय सहन करावी लागली. पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अखेर रात्री उशिरा सर्व अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता स्वच्छ केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पोलिसांचा तपास सुरू
बाह्यवळळ महामार्गावरील अपघाताचे नेमके कारण वेग, चालकाचा निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महामार्गावरील वळणांवर वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे नव्याने तयार झालेल्या बाह्यवळण महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
