जळगाव : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ पहिल्याच पावसाळ्यात उघडे पडले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलालगत महामार्ग दोन्ही बाजूंनी दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ या मार्गावरील सर्व वाहतूक बंद केली असून, वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास महामार्गावरील मध्य रेल्वे उड्डाणपुलाजवळील भरावाचा भाग अचानक खचल्याचे निदर्शनास आले. काही मिनिटांतच रस्त्याला मोठ्या भेगा पडू लागल्या. दोन्ही बाजूंना माती सरकल्याने रस्त्याचा पाया कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसून आले. माहिती मिळताच पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गाच्या भरावाची स्थिती धोकादायक असल्याने कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून तातडीने वाहतूक बंद करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही टोकांना बॅरिकेड्स लावून मार्ग रोखून धरला. अवजड वाहने, मालवाहू ट्रक तसेच इतर वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही त्यास दुजोरा दिला.

वाहतुकीवर मोठा परिणाम

पाळधी ते तरसोद बाह्यवळण मार्ग हा जळगाव शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय मानला जातो. धुळे, भुसावळच्या दिशेने जाणारी अनेक जड वाहने या मार्गाचा वापर करतात. हा मार्ग बंद झाल्यामुळे वाहनांना शहरातून किंवा इतर पर्यायी मार्गांनी जावे लागत असून अनेक ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढला आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. महामार्ग खचण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली येथून वरिष्ठ अभियंते आणि तज्ज्ञांचे विशेष पथक शनिवारी जळगावात दाखल होणार आहे. हे पथक घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल तयार करणार असून त्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्तीच्या कामाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नुकत्याच पूर्ण करण्यात आलेल्या बाह्यवळण महामार्गावर पहिल्याच पावसाळ्यात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भरावाची मजबुती, जलनिस्सारण व्यवस्था, मातीचे योग्य दाबीकरण आणि बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या दर्जाबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. वाहन चालकांनी संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही रस्ता काही महिन्यांतच खचणे ही गंभीर बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

तात्पुरती दुरुस्ती; धोका कायम

घटनास्थळी तातडीने भेगा बुजविण्याचे आणि खचलेल्या भागात मुरूम व दगड टाकून भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ही केवळ तात्पुरती उपाययोजना असल्याचे अभियंते सांगत आहेत. रस्त्याचा पाया कमकुवत झाल्याची शक्यता असल्याने संपूर्ण तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार नाही. या प्रकारानंतर महामार्गाच्या संपूर्ण बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी झाली होती का, संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची योग्य पाहणी केली होती का आणि निकृष्ट कामाला जबाबदार कोण, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.