जळगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे कोंबिंग ऑपरेशन राबविले. जळगाव शहरासह औद्योगिक वसाहत, शनिपेठ आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल १०४ संशयितांना कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पहाटे कोंबिग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी गणापुरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, औद्योगिक वसाहत ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, रामानंदनगरचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शनिपेठच्या निरीक्षक कावेरी कमलाकर आणि शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश आव्हाड हे सहभागी झाले होते.

पहाटे चारच्या सुमारास सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकांनी एकाच वेळी चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या वस्त्या, त्यांची निवासस्थाने आणि लपण्याची संभाव्य ठिकाणी हेरून छापे टाकले. अनेक जण झोपेत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करणे, ते सध्या काय करतात, त्यांच्या हालचाली काय आहेत, याची नोंद घेणे आणि त्यांना गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करणे, हा कोंबिंग ऑपरेशनचा उद्देश होता. कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व १०४ संशयितांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र आणले गेले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणापुरे आणि उपस्थित पोलीस निरीक्षकांनी सर्वांची परेड घेत त्यांना सक्त ताकीद दिली.

शहरातील शांतता भंग करण्याचा किंवा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात पुन्हा सहभाग घेतल्याचे आढळल्यास कोणाचीच गय केली जाणार नाही. यापुढे किरकोळ कारवाई न करता थेट तडीपारीची कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला. कायदेशीर समज आणि ताकीद दिल्यावर सर्व १०४ संशयितांना समजपत्र लिहून घेतल्यानंतर सोडण्यात आले. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे जळगाव शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरातही मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत विविध गुन्ह्यातील १५ फरार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याशिवाय, पोलीस दलाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात नुकतेच नाकाबंदीसह ऑल आऊट ऑपरेशन राबवले. या मोहिमेत २६९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. आणि २,४५८ वाहनांची कसून तपासणी करून ८२ तडीपार गुन्हेगारांची सखोल चौकशी करण्यात आली होती.