जळगाव : जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच संशयितांना अटक केली असून, कारवाईत सुमारे २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहूर पोलिसांना दोन मार्च रोजी रात्री ११.४२ वाजता इनोव्हा कारमधून जळगावकडून पहूरकडे अमली पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून वाकोद गावाजवळ संशयित वाहन अडवले. कसून तपासणी केली असता कारमध्ये तब्बल ६३.७१० किलो गांजा आढळून आला.
या गांजाची अंदाजे किंमत १२ लाख ७४ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली सुमारे सात लाख रुपये किमतीची सिल्वर रंगाची इनोव्हा कार आणि तीन लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती रिट्झ कार, असा एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी सागर संजय इंगवले (रा. नवी मुंबई), इरफान अकरम शेख (रा. गोरेगाव, मुंबई), अमन ताज खान (रा. वर्सोवा, मुंबई), या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत संशयितांना हा गांजा धुळे शहरातील नईम शेख याकूब, आबीद खान मेहमूद खान आणि तोहसिफ खान रसूल खान यांच्याकडून खरेदी करून त्याची वाहतूक करत असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सर्व संशयितांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), २२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी संपूर्ण पथकाचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी पथकासह माहितीची खातरजमा करून संशयित वाहनांचा मागोवा घेत सापळा रचला. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू करत संबंधित परिसरात तपासणी मोहीम राबवली. संशयित वाहनांची अचूक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ठिकाणी सापळा रचून वाहन अडवले. आणि तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते हे करीत असून, या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अमली पदार्थांचे जाळे इतर जिल्ह्यांपर्यंत पसरले आहे का याचा तपास सुरू आहे.
