जळगाव : पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुण-तरुणींना आगामी भरतीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने बहुतेकांनी लेखी परीक्षेसह शारीरिक चाचणीसाठी आवश्यक सरावावर भर देखील दिला आहे. संबंधितांना पोलीस दलातर्फे भुसावळ येथे आयोजित विशेष प्रशिक्षण शिबिरात भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची माहिती, शारीरिक चाचण्यांचे प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन मिळाल्याने आवश्यक दिशा मिळाली. भुसावळ येथील रेल्वे ग्राउंडवर पार पडलेल्या या उपक्रमात ६०० हून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदवला.

आजची तयारी; उद्याचा पोलीस अधिकारी!

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘आजची तयारी… उद्याचा पोलीस अधिकारी!’ या संकल्पनेतून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीच्या प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी, त्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात आणि आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. भुसावळ उपविभागासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार या शिबिरात सहभागी झाले. पोलीस भरतीसाठी केवळ शारीरिक क्षमता पुरेशी नसून लेखी परीक्षेची तयारी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि भरतीच्या नियमांची माहितीही तितकीच महत्त्वाची असल्याचे या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.

मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव) तसेच भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिबिराच्या आयोजनासाठी भुसावळ उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले. उमेदवारांना प्रत्यक्ष भरती प्रक्रियेचा अनुभव मिळावा, यासाठी विविध प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले होते.

उंची,  छाती मोजमापाचे प्रात्यक्षिक

पोलीस भरतीतील शारीरिक पात्रता हा महत्त्वाचा टप्पा असल्याने उमेदवारांना उंची आणि छाती मोजण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. अधिकृत भरती नियमांनुसार उमेदवारांची उंची कशी मोजली जाते, तसेच छातीचे मोजमाप न फुगवता आणि फुगवून कशा पद्धतीने घेतले जाते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना मोजमापासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. भरतीच्या वेळी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

गोळाफेकीचे तंत्रही सांगितले

मैदानी चाचणीमध्ये गोळाफेक या प्रकाराला विशेष महत्त्व असते. अनेक उमेदवारांना योग्य तंत्राची माहिती नसल्यामुळे अपेक्षित कामगिरी करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शिबिरात गोळाफेकीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. गोळा योग्य पद्धतीने कसा धरावा, फेकताना शरीराचा समतोल कसा राखावा, ताकदीचा योग्य वापर कसा करावा आणि फाऊल होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात आले. केवळ ताकदीच्या जोरावर नव्हे, तर योग्य तंत्र आणि नियमित सरावाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करता येते, हे उमेदवारांना समजावून सांगण्यात आले.

कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत सूचना

पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक आणि लेखी परीक्षेइतकीच कागदपत्रांची पूर्तताही महत्त्वाची असते. अनेकदा आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध नसल्याने उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिबिरात कागदपत्र पडताळणीसंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आली. अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भरती प्रक्रियेच्या वेळी कागदपत्रांमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी आधीपासूनच तयारी करावी, असे सांगण्यात आले.

लेखी परीक्षेपासून मैदानी चाचणीपर्यंत

पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेची तयारी करताना सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी व्याकरण या विषयांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासाचे नियोजन, नियमित सराव, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि परीक्षेतील वेळेचे व्यवस्थापन याबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी शारीरिक तंदुरुस्ती राखणे, नियमित व्यायाम करणे, धावण्याचा सराव आणि विविध शारीरिक प्रकारांमध्ये कौशल्य विकसित करणे यावर भर देण्यात आला. लेखी आणि मैदानी अशा दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी केल्यास भरती प्रक्रियेत चांगली कामगिरी करता येऊ शकते, हे उमेदवारांना पटवून देण्यात आले.