जळगाव: जिल्ह्यातील राजकारणात पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडींची चाहूल लागली आहे. माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे चाळीसगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना आगामी निवडणुकीत थेट शह देण्याची रणनीती आतापासून आखली जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अलीकडे पार पडलेल्या नगर परिषदांसह जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळख निर्माण करणारे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद दाखवत अनेक ठिकाणी शिंदे गटासाठी अडचणी निर्माण केल्या. पाचोरा आणि भडगाव तालुक्यांत तर भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत रंगली होती. स्थानिक पातळीवरील या संघर्षामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव अधोरेखित झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांविरुद्ध उघडपणे प्रचार करताना दिसले. या पार्श्वभूमीवर पुढील विधानसभा निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत.

दोन्ही पाटील आता एकाच पक्षात

माजी खासदार उन्मेश पाटील चाळीसगाव आणि परिसरातील प्रभावी नेतृत्व मानले जाते. त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क, शेती प्रश्नांवरील भूमिका आणि संघटन कौशल्य यामुळे ते आजही राजकीय समीकरणात महत्त्वाचे ठरतात. शिवसेना शिंदे गटाने त्यांना सोबत घेतल्यास भाजपसमोर थेट आव्हान भविष्यात उभे राहू शकते. मात्र, उन्मेश पाटील आणि शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील संबंध पूर्वीपासून फारसे सुरळीत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीत एकत्र काम करत असतानाही दोघांमधील मतभेद उघडपणे दिसून आले होते. त्यामुळे संभाव्य पक्ष प्रवेशानंतर माजी खासदार पाटील आणि पालकमंत्री पाटील यांच्यात स्थानिक स्तरावर सुसंवाद राखणे शिंदे गटासाठी आव्हानात्मक ठरू शकते.

आमदार किशोर पाटील खरे सूत्रधार

पाचोऱ्यातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला खुला विरोध केल्यानंतर त्यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढले आहे. संघटन कौशल्याच्या जोरावर रणनीती आखण्यात ते अग्रस्थानी असल्याचे दिसून आले आहे. चाळीसगाव मतदारसंघात भाजपला अडचणीत आणण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा होती. पाचोरा-भडगाव पट्ट्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्याचा प्रयत्न करताना शिंदे गटाने स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच धर्तीवर शिंदे गटाची पाचोरा-भडगाव आणि चाळीसगाव मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही आतापासून तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामागेही आमदार किशोर पाटील यांचीच रणनीती असल्याचे बोलले जाते.

महायुतीसमोर मोठा प्रश्नचिन्ह

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात विधानसभेत थेट उमेदवार उभा करायचा झाल्यास भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला महायुतीच्या चौकटीबाहेर जावे लागेल. असे झाल्यास राज्यभर दोन्ही पक्षांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागेल. सध्याच्या राजकीय समीकरणात ही शक्यता दूरची वाटत असली, तरी स्थानिक पातळीवरील संघर्षामुळे राज्यस्तरीय नेतृत्वालाही भूमिका स्पष्ट करावी लागेल. महायुती टिकवायची की स्थानिक वर्चस्वासाठी स्वतंत्र लढत द्यायची, हा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर उभा ठाकणार आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या नव्या वळणावर उभे आहे.

माजी खासदार उन्मेश पाटील यांचा संभाव्य पक्ष प्रवेश, शिंदे गटाची रणनीती, भाजपची संघटनात्मक ताकद आणि महायुतीचे भवितव्य, या सर्व घटकांवर चाळीसगाव मतदारसंघातील पुढील लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत.