जळगाव : जिल्ह्यात चाळीसगाव आणि पाचोरा-भडगाव मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आमदार मंगेश चव्हाण यांचे खंदे समर्थक प्रा. सुनील निकम यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमधून आमदार किशोर पाटील यांच्यावर जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही मतदारसंघातील प्रशासकीय व्यवस्थेची तुलनात्मक माहिती असलेला तक्ताही त्यांनी पोस्टसोबत जोडल्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.
प्रा. निकम यांनी आपल्या पोस्टची सुरुवातच “पाचोर्याच्या आप्पांना एकच सवाल… चाळीसगावचा एवढा द्वेष का?” अशा थेट प्रश्नाने केली आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर वैयक्तिक निशाणा साधत चाळीसगाव मतदारसंघातील विकासकामांवर सातत्याने टीका करण्याऐवजी स्वतःच्या मतदारसंघातील विकासाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, असे आव्हान दिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, तुम्ही स्वतः म्हणजे भडगाव आणि पाचोरा नाही. तुमच्यात दम असेल तर तुम्हीही उपजिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून दाखवा. प्रा. निकम यांनी या विधानातून चाळीसगावला मिळालेल्या विविध सुविधा आणि प्रशासकीय कार्यालयांचा उल्लेख करत त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याचेही कौतुक केले आहे.
१३ वर्षे विरुद्ध ६ वर्षांची तुलना
प्रा. निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या १३ वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एवढा मोठा कालावधी सत्तेत राहूनही पाचोरा-भडगाव मतदारसंघात अपेक्षित प्रमाणात विकास घडवून आणता आला नाही. त्याउलट, आमदार मंगेश चव्हाण यांनी अवघ्या सहा वर्षांच्या कालावधीत चाळीसगाव मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी मिळवून दिली, विविध प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तुलनात्मक तक्त्याची राजकीय चर्चा
प्रा. निकम यांच्या पोस्टमध्ये जोडलेल्या तक्त्यामध्ये दोन्ही मतदारसंघांतील विविध प्रशासकीय सुविधांची तुलना करण्यात आली आहे. त्यामध्ये शासकीय कार्यालये, प्रशासकीय सुविधा, विविध विकास प्रकल्प, मंजूर निधी आणि इतर कामांचा उल्लेख करून चाळीसगाव मतदारसंघ विकासाच्या बाबतीत आघाडीवर असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रा. निकम यांनी या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला असून, विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी तथ्यांसह चर्चा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
“विकासावर बोला, व्यक्तीवर नाही”
प्रा. निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये विरोधकांवर टीका करत विकासाच्या मुद्यावर राजकारण करण्याऐवजी वस्तुस्थिती स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. चाळीसगाव मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढला असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मंगेश चव्हाण सातत्याने प्रयत्नशील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, “चाळीसगावचा विकास जनतेसमोर आहे. तुलना करायची असेल तर आकडेवारी आणि विकासकामांच्या आधारे करा,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमधून सूचित केले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि आमदार मंगेश चव्हाण समर्थक प्रा. सुनील निकम यांच्या पोस्टनंतर चाळीसगाव आणि पाचोरा-भडगाव परिसरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसून आली आहेत. सोशल मीडियावर या पोस्टवर समर्थक आणि विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, विकासाच्या मुद्द्यावर नव्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता या आरोपांवर आमदार किशोर पाटील किंवा त्यांच्या समर्थकांकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
