जळगाव : जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारी घडामोड लवकरच घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सलग निवडणूक पराभवांमुळे संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत झालेल्या शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षातील एक प्रभावी आणि जिल्हा पातळीवर मजबूत जनाधार असलेला नेता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नेत्याचा प्रवेश येत्या शुक्रवारी मुंबईत होणार असल्याची चर्चा असून, संबंधित नेत्याच्या नावाबाबत कमालीची गुप्तता राखली जात आहे.लोकसभा, विधानसभा तसेच नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला जळगाव जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. ग्रामीण भागात पक्षाची पकड सैल होत गेली, तर शहरी मतदारसंघांमध्येही पक्षाची ताकद घटल्याचे चित्र दिसले. परिणाठाकरेमी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच सध्या निर्णायक नेतृत्व आणि स्पष्ट दिशा नसल्याची खंत खासगीत व्यक्त केल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, संबंधित नेत्याने आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करत शिंदे गटाशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे गटात प्रवेश करूनही अपेक्षित स्थान, संधी आणि संघटनात्मक पाठबळ न मिळाल्याने त्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती, असेही बोलले जाते.
गुप्त बैठका, पडद्यामागील हालचाली
गेल्या काही दिवसांत शिवसेना शिंदे गटात मुंबई आणि जळगावदरम्यान काही गुप्त बैठका झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्याची वरिष्ठ नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मजबूत चेहरा आपल्या गोटात आणण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यात शिंदे गटाने थोडी संयमाची भूमिका घेतली होती. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक विस्ताराला वेग देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नाराज माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढविण्यात आल्याचे समजते.
ठाकरे गटासाठी वैयक्तिक धक्का?
अलीकडेच पक्षात प्रवेश केल्यानंतर स्वतःसह पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याचा आता शिंदे गटात प्रवेश झाला तर तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी वैयक्तिक धक्का मानला जाईल. जळगाव जिल्हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा प्रभाव असलेला मानला जात होता. मात्र फुटीनंतर दोन्ही गटांत झालेल्या राजकीय संघर्षात संघटनात्मक बळ टिकवणे ठाकरे गटासाठी आव्हानात्मक ठरले आहे. पक्षाची गळती रोखण्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा, दौरे आणि बैठका आयोजित केल्या जात असल्या, तरी स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कमी झालेली नाही. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने राज्यभर विस्तार मोहिम हाती घेतली आहे. जिथे नाराजी-तिथे संधी, या धोरणानुसार विरोधी गटांतील नाराज नेत्यांना आपल्या गोटात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील संभाव्य प्रवेश हा त्याच धोरणाचा भाग मानला जात आहे.
भाजपची भूमिका काय?
महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या भाजपसाठी ही घडामोड द्विधा परिस्थिती निर्माण करणारी ठरू शकते. एका बाजूला महायुती मजबूत करण्यासाठी शिंदे गटाचे बळ वाढणे फायदेशीर ठरू शकते; तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील जागावाटपात शिंदे गट अधिक आक्रमक भूमिका घेतल्यास अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, संबंधित नेत्याच्या प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या संभाव्य प्रवेश सोहळ्याकडे जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते आणि विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. हा प्रवेश झाला, तर जळगावच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
