जळगाव : ‘अमृत भारत’ योजनेच्या माध्यमातून जळगाव रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, पुनर्विकासाच्या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली आहे. रेल्वे प्रशासनाने तयार केलेला सविस्तर बांधकाम विकास आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर विविध कामांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, सातव्या फलाटाच्या कामालाही अलीकडे गती देण्यात आली आहे.
भुसावळ-मुंबई (मध्य रेल्वे) आणि भुसावळ-सुरत (पश्चिम रेल्वे) या दोन महत्त्वाच्या मार्गांवरील जंक्शन म्हणून जळगाव स्थानकाची ओळख आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करत असल्याने वाढत्या गर्दीचा ताण लक्षात घेऊन सुविधा विस्ताराची गरज भासू लागली होती. सध्या स्थानकावर सहा फलाट कार्यरत असून, त्यापैकी पहिला आणि दुसरा फलाट प्रत्येकी ५२६ मीटर, तिसरा आणि चौथा ६२३ मीटर, तर पाचवा आणि सहावा फलाट प्रत्येकी ५५८ मीटर लांबीचा आहे. या विद्यमान क्षमतेत वाढ करण्यासाठी सातव्या फलाटाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी जुना मालधक्का (माल शेड) नुकताच जमीनदोस्त करण्यात आला आहे.
सातव्या फलाटाची अशी रचना
सातव्या फलाटाची रचना करताना ‘सुलभ प्रवास’ मुख्य केंद्रबिंदू ठेवण्यात आला आहे. या फलाटावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना जिने चढण्याची गरज भासणार नाही, अशी समतल व थेट प्रवेश व्यवस्था तयार केली जाणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह अपंग, महिलांसह लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच फलाटांवर आधुनिक शेड, डिजिटल माहिती फलक, उच्च दर्जाची प्रकाश योजना आणि सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे. पुनर्विकास आराखड्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यमान मुख्य स्थानक इमारतीचे पुनर्निर्माण. सध्या अस्तित्वात असलेली जुनी इमारत पाडून तिच्या जागी अत्याधुनिक, तीन मजली आणि प्रशस्त इमारत उभारली जाणार आहे.
नवीन इमारतीत या सुविधा
नवीन प्रशस्त इमारतीत प्रवाशांसाठी मोठ्या व आरामदायी प्रतीक्षालयाची व्यवस्था, संगणकीकृत व स्वयंचलित तिकीट काउंटर, स्वच्छ आणि देखभालक्षम स्वच्छतागृहे, लिफ्ट आणि एस्कलेटरची सोय, तसेच दीर्घ प्रवास करणाऱ्यांसाठी विश्रांतीगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपंग प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग, रॅम्प, स्पर्शज्ञान (टॅक्टाइल) मार्गदर्शक पट्ट्या आणि इतर आवश्यक सुविधा देखील उपलब्ध केल्या जाणार आहेत.
स्थानक परिसराच्या बाह्य भागातही मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले जाणार आहेत. आकर्षक आणि विस्तृत प्रवेशद्वार उभारण्यासोबतच उत्तर व दक्षिण बाजूस स्वतंत्र वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे.
आदर्श स्थानकाचे रुप
जळगाव रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून, पादचारी मार्ग आणि वाहतूक नियोजन अधिक शिस्तबद्ध केले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, पुढील काही महिन्यांत स्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतील. पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जळगाव स्थानक हे केवळ प्रवासासाठीचे केंद्र न राहता आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित सुविधा देणारे आदर्श स्थानक म्हणून विकसित होईल.
