जळगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी गर्दी होत असते. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्याने वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडतो. अशा स्थितीत प्रवाशांना दररोज मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असताना, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी आणखी दुसऱ्या रस्त्याचा पर्याय आता पुढे आला आहे.
जळगाव रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्ता आधीच अरुंद असून त्यावर मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक वाहने उभी करतात. अनेकदा दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकही रस्त्यावरच वाहने लावत असल्याने प्रवाशांना रस्त्याने चालण्यासाठी पुरेशी जागा राहत नाही. त्यातच खाद्यपदार्थ विक्रेते, चहाच्या टपऱ्या आणि विविध हातगाड्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजू व्यापल्याने परिसरात कायम गोंधळाचे वातावरण निर्माण होत असते. प्रवाशांना स्थानकामध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अक्षरशः कसरत करावी लागते. विशेषतः रेल्वे गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट बनते. अनेकदा रिक्षाचालकांमध्ये प्रवासी घेण्यावरून वाद होतात, तर वाहनांच्या कोंडीतून मार्ग काढताना किरकोळ अपघातांच्या घटनाही घडतात. रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांनाही अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.
अतिक्रमणामुळे प्रवाशांना डोकेदुखी
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रेल्वे स्थानकासमोरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करत अनेक हातगाड्या जप्त केल्या होत्या. या कारवाईनंतर काही दिवस परिसर मोकळाही दिसून आला. वाहतूक कोडींतून दिलासा मिळाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, ही स्थिती फार काळ टिकली नाही. कारवाईनंतर पुन्हा काही दिवसांतच विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी हातगाड्या उभ्या करण्यास सुरुवात केली. त्यामुळे समस्या पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. महापालिकेकडून महिना किंवा दोन महिन्यांतून एकदा अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असली, तरी त्यात सातत्य नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. अनेकदा मनपाचे पथक येते, अवघ्या काही मिनिटांत एखादी-दुसरी हातगाडी जप्त करते आणि निघून जाते. त्यानंतर पुन्हा त्या परिसराकडे लक्ष दिले जात नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावत असल्याचे चित्र आहे. मनपाच्या थातूरमातूर कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये कोणतीही भीती उरलेली नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पर्यायी रस्ता कुठे?
रेल्वे स्थानकावर येणाऱ्या बाहेरगावच्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक प्रवाशांना अनधिकृत वाहनतळ, रिक्षा आणि हातगाड्यांच्या गर्दीतून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती अधिकच बिकट बनते. अनेकदा रेल्वे पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे उशीर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. दरम्यान, या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पर्यायी रस्त्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. रेल्वे स्थानकावर सध्या सुरू असलेल्या सातव्या फलाटाच्या कामामुळे या भागात नवीन सुविधा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा नवीन फलाट उभारताना हॉटेल के.पी. प्राईड समोरील बाजूने पर्यायी रस्ता विकसित केल्यास रेल्वे स्थानकासमोरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यापूर्वी हॉटेलच्या बाजूने मालधक्का कार्यरत असताना अवजड वाहनांसाठी तो रस्ता वाहतुकीसाठी खुला होताच. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात विभागला गेला जात होता.
