जळगाव : हनुमान जयंतीनिमित्त विविध ठिकाणची मंदिरे सजतात. सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून येते. तालुक्यातील रिधुरचे अवचित हनुमान मंदिर त्यापैकीच एक असले, तरी तेथील हनुमानाची मूर्ती एखाद्या पाषाणातून नव्हे तर भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारलेली असल्याने लक्षवेधी ठरते. विशेष म्हणजे लोण्यातून तयार केलेली त्याठिकाणची मूर्ती उन्हाळ्यातील ४४-४५ डिग्री तापमानातही वितळत नाही, असे सांगितले जाते.

अवचित हनुमान मंदिराचा गेल्या काही वर्षात मोठा विकास झाला आहे. त्या ठिकाणी उंच गाभारा असलेल्या मंदिरासह भव्य सभामंडपाची सोय करण्यात आल्यानंतर विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. याशिवाय लग्नकार्यही पार पडतात. १९८६ मध्ये नगर जिल्ह्यातील कोळगाव येथून आलेले स्वामी माधवदास यांचे अवचित हनुमान मंदिराचा कायापालटात मोठे योगदान राहिले आहे.

महसूल विभागाच्या दप्तरी ‘मौजे मत्याणे’, अशी नोंद असलेल्या अवचित हनुमान मंदिर परिसराला काळाच्या ओघात भग्नावस्था आली होती. मात्र, स्वामी माधवदास यांच्या प्रयत्नांनी ते पुन्हा नावारूपास आले.

असे पडले अवचित हनुमान नाव

सध्या अस्तित्वात असलेल्या अवचित हनुमान मंदिरालगत कधीकाळी खूप मोठे वडाचे झाड होते. त्याखाली परिसरातील गुराखी त्यांची जनावरे चारण्यासाठी आल्यावर थोडावेळ विश्रांती घ्यायचे. एकेदिवशी एका गुराख्याला स्वप्न पडले, की वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर तुमच्या गावाचे कल्याण होईल, असा दृष्टांत त्याला मिळाला.

काही दिवसांनी जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम सुरू केले. मात्र, गावातील मोठ्या जमीनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. काही दिवसांनी जमिनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढून तिची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. अचानक प्रगटलेल्या हनुमानाला त्या दिवसापासून ‘अवचित हनुमान’ संबोधले जाऊ लागले.

अमावस्या, पौर्णिमा लोणी चढवण्याची प्रथा

दरम्यानच्या काळात गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे एक जवळचे नातेवाईक मुक्कामी थांबले होते. माझ्या गोठ्यातील दूध न देणारी म्हैस पूर्वपत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल, असे बोलून त्यांनी अवचित हनुमानाला साकडे घातले. आश्चर्य म्हणजे त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी भरपूर दूध दिले. नवस कबूल केल्यानुसार एका मडक्यात लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिराकडे निघाली.

पण छताला टांगलेले लोण्याचे मडके जशाचे तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीवर लोणी चढवण्याची प्रथा सुरू झाली. ज्यामध्ये आजतागायत कोणताच खंड पडलेला नाही, असे भाविकांकडून सांगितले जाते.

चालत आल्याने त्यांना अंधार होण्याआधी अवचित हनुमानाचे मंदिर गाठता आले नाही. त्यामुळे सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने त्यांनी लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाईकाकडेच मुक्काम केला. परंतु, त्या रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते, त्यांच्या घराला अचानक मोठी आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रिधुरच्या अवचित हनुमान मंदिरावर दरवर्षी हनुमान जयंतीला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. चैत्र चतुर्दशीच्या दिवशी रात्रीच तिथे भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. या दिवशी तिथे महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. सकाळी साडेचार वाजता अभिषेक तसेच पाच वाजता चोला चढविण्यासह सहा वाजता आरती केली जाते, अशी माहिती मंदिराचे सेवक दीपक महाराज यांनी दिली.