जळगाव : कारच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना खासगी एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. जळगावातील इच्छादेवी चौक परिसरात बजाज टी.व्ही.एस. शोरूम येथे ही कारवाई करण्यात आली.

योगेश रामभाऊ पाटील (३९, रा. आदर्शनगर, जुना आरटीओ परिसर, जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार ४९ वर्षीय खासगी वकील आहेत. आणि ते दोन्ही पायांनी अपंग आहेत. त्यांनी एक जुलै रोजी खान्देश मोटर्स शोरूममधून मारुती कंपनीची अल्टो के-१० व्हीएक्सआय कार खरेदी केली होती. या कारची ३ ऑगस्ट रोजी संबंधित शोरूममधील खासगी एजंट योगेश पाटील यांच्यामार्फत आरटीओ कार्यालयात तात्पुरती नोंदणी (सीआरटीएम) करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या अपंगत्वामुळे कारमध्ये हँड कंट्रोल बसवून घेतले. कारचे कायमस्वरूपी पासिंग करून घेण्यासाठी ते १२ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांची योगेश पाटील यांच्याशी भेट झाली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावाने मागणी

तक्रारदाराच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांकडून करून आणून देण्यासाठी योगेश पाटील याने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मागणीबाबत तक्रारदाराने १७ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी आरटीओ कार्यालयाच्या पटांगणात पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. या पडताळणीदरम्यान योगेश पाटील याने तक्रारदाराच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या नावाने ८५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वीकारण्यास त्याने संमती दर्शविली.

७ हजार रुपये स्वीकारताना कारवाई

पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. जळगाव शहरातील इच्छादेवी चौक येथील बजाज टी.व्ही.एस. शोरूममध्ये संशयित योगेश पाटील याने तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल होताच संशयिताच्या अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एसीबी पथकात यांचा समावेश

ही कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार सुनील वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांचा समावेश होता.