जळगाव : कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताई मंदिराच्या परिसरातील विकास कामे गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत असून, मंदिरावर आजही कळस नसल्याने भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

२०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीने कोथळीत प्रस्तावित संत मुक्ताईंच्या मंदिरासाठी सुमारे १०० कोटींच्या भव्य विकास आराखड्यातून पहिल्या टप्प्यात २५ कोटींच्या निधीस मंजुरी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात आजतागायत केवळ नऊ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. २०१८ नंतर एकही रुपयाचा निधी मंजूर न झाल्याने हा प्रकल्प थंड बस्त्यात गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सरकारला लक्षवेधी प्रश्न विचारला. पंढरपूर आणि शिर्डी या धार्मिक स्थळांप्रमाणेच कोथळी येथील संत मुक्ताईंच्या मंदिराचा विकास आराखडा तयार करून विकास कामांना गती देणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

किंमत वाढली; सुधारीत मान्यतेची गरज

कोथळीतील संत मुक्ताईच्या मंदिरावर प्रस्तावित असलेली विकास कामे अनेक वर्षे रखडल्याने प्रकल्पाची किंमत आजच्या घडीला प्रचंड वाढली आहे. २०१५ मध्ये सुमारे १०० कोटी रुपयांच्या आराखड्याची आजची किंमत नैसर्गिकरीत्या वाढली असून, ती गृहीत धरून सुधारीत मंजुरी देणे गरजेचे असल्याचे आमदार खडसे यांनी विधिमंडळात बोलताना स्पष्ट केले. त्यांनी मंदिराचे आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत संत मुक्ताई भक्तांच्या भावनांचा आवाज सभागृहात पोहोचवला.

मंत्र्यांचे आश्वासन; उर्वरित निधी लवकरच

दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी महत्त्वपूर्ण आश्वासने दिली. मंजूर २५ कोटी रुपयांच्या निधीपैकी उर्वरित निधी शिखर समितीच्या मान्यतेनंतर त्वरीत दिला जाईल, असेही मंत्र्यांनी सभागृहात जाहीर केले. तसेच प्रकल्प रेंगाळल्याने लागत असलेली अतिरिक्त रक्कम विचारात घेऊन सुधारित मान्यतेची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. याशिवाय, प्रस्तावित १०० कोटींच्या संपूर्ण विकास आराखड्यावरही लवकरच कार्यवाही होणार असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले.

विकासकामांना वेग मिळण्याची अपेक्षा

कोथळीत संत मुक्ताई मंदिराचे काम पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरातील वारकरी व भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे. गेली आठ-नऊ वर्षे अपूर्ण असलेल्या संत मुक्ताईंच्या मंदिर विकास प्रकल्पाला नवे बळ मिळणार असल्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः मंदिराचा कळस उभारला जावा, मूळ आराखडा पूर्णत्वास जावा आणि परिसराचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी स्थानिकांमधून होत होती. आता शासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर या प्रकल्पाला प्रत्यक्ष वेग मिळतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.