जळगाव : तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून तब्बल २७ किलो सोने आणि १२ लाख रुपयांहून अधिक रोकड लंपास केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चार सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून देशी कट्ट्यातून गोळी झाडत कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली. त्यानंतर बँक कर्मचारी आणि व्यवस्थापकाला बांधून त्यांच्या तोंडाला पट्टी लावण्यात आली. अवघ्या काही वेळात कोट्यवधींचे सोने आणि रोकड लुटून सहा बॅगांसह दोन मोटारसायकलींवरून दरोडेखोर पसार झाले होते.

या प्रकरणाच्या तपासात समोर आलेली संशयितांची  पार्श्वभूमी अधिकच धक्कादायक आहे. विशेषतः या दरोड्याच्या कटातील प्रमुख संशयित  म्हणून समोर आलेल्या शंकर रमेश जासक याचा पोलीस दलातील अधिकारी ते गंभीर गुन्ह्यांतील आरोपी असा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. कधीकाळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणारा अधिकारी पुढे गुन्हेगारी प्रकरणांत अडकला आणि अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ झाला. आता पुन्हा भोकर गावातील बँक दरोड्याच्या कटात त्याचे नाव समोर आल्याने त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी इतिहासाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

उपनिरीक्षक ते दरोड्याच्या कटातील संशयित

शंकर रमेश जासक (वय ४३) हा मूळचा जळगाव येथील रहिवासी असून त्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या २०१५ मधील ११३ व्या बॅचमधून त्याची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर रायगड जिल्हा पोलीस दलात त्याने सेवा बजावली. पोलीस दलात अधिकारी म्हणून काम करताना त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. त्याच्या कारकिर्दीला पहिला मोठा धक्का २०१८ मध्ये बसला. महाड (जि. रायगड) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईशी संबंधित प्रकरणात त्याच्याविरुद्ध महाड पोलीस ठाण्यात २७ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणानंतर त्याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

निलंबन रद्द; पुढे पुन्हा गंभीर प्रकरण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर निलंबित झालेल्या शंकर जासकला तत्कालीन पोलीस अधीक्षक अशोक धुडे यांनी जून २०२१ मध्ये पुन्हा सेवेत घेतले. त्यानंतर त्याची रायगड जिल्हा नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्याच्या पोलीस कारकिर्दीतील हे शेवटचे वादग्रस्त प्रकरण ठरले नाही. जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या स्टेट बँक दरोडा प्रकरणात त्याचे नाव आरोपी म्हणून समोर आले. या प्रकरणाने त्याच्या पोलीस सेवेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

२०२३ मध्ये पोलीस सेवेतून बडतर्फी

जळगाव येथील शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल एसबीआय दरोडा प्रकरणात गुन्हा क्रमांक ९३/२०२३, कलम ३९४ आणि ३४ भादंवि अन्वये शंकर जासक याचा आरोपी म्हणून समावेश होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी २०२३ मध्ये त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जासकचे वडील आणि संबंधित बँकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला त्याचा मेहुणा यांचाही आरोपी म्हणून समावेश होता. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांचीच बँक दरोड्याच्या प्रकरणात नावे समोर आल्याने त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.

कारागृहातील ओळखीतून दरोड्याचा कट?

दरम्यान, भोकर येथील बँक दरोड्याच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील तीन संशयितांजी ओळख काही वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा कारागृहात झाली होती. कारागृहातील ओळखीनंतर त्यांच्यात संपर्क वाढला आणि पुढे चौथ्या संशयिताला सोबत घेऊन बँक दरोड्याचा कट रचण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. माजी पोलीस अधिकारी असलेल्या जासकला पोलीस यंत्रणेची कार्यपद्धती, तपासाची दिशा आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती असल्याने या प्रकरणातील त्याची भूमिका तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. मात्र, त्याने नेमकी कोणती भूमिका बजावली, दरोड्याचे नियोजन कसे केले आणि इतर आरोपींना कशा प्रकारे सहभागी करून घेतले, याचा उलगडा पोलीस तपासातून होणे अपेक्षित आहे.

खाकी वर्दीचा अनुभव गुन्हेगारीसाठी?

एकेकाळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणारा अधिकारी, लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित होणे, त्यानंतर बँक दरोडा प्रकरणात आरोपी होणे आणि अखेर सेवेतून बडतर्फ होणे, असा शंकर जासक याचा प्रवास समोर आला आहे. आता भोकर येथील कोट्यवधींच्या दरोड्याच्या कटात त्याचे नाव समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस दलातील अनुभव, गुन्हेगारी जगतातील कथित संपर्क आणि कारागृहातील ओळखींचा वापर करून एवढ्या मोठ्या दरोड्याचे नियोजन करण्यात आले का, याचा तपास सध्या महत्त्वाचा ठरणार आहे.