जळगाव – राज्य सरकारच्या पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांनी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य राजकीय सलोखा चर्चेचा विषय ठरला असतानाच, जळगावात ठाकरे गटासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पहिलीपासून हिंदी शिकविण्याबाबतच्या जीआरची होळी केली. .
पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याच्या दोन्ही पक्षांच्या समान भूमिकेमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंमधील संभाव्य मनोमीलनाच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. राज्यभरात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी इच्छा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.
जळगाव शहरातही रविवारी त्याची प्रचिती आली. राज्य शासनाच्या पहिलीपासून हिंदी शिकविण्याची सक्ती करणाऱ्या जीआरची होळी करण्यासाठी ठाकरे गटाने आंदोलन पुकारले होते. प्रत्यक्षात, त्या आंदोलनात ठाकरे गटासमवेत मनसेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आंदोलनातील अनपेक्षित चित्र पाहिल्यानंतर अनेक जण त्यामुळे कोड्यात पडले.
दोन्ही पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर पहिलीपासून हिंदी शिकविण्याची सक्ती करणाऱ्या जीआरची होळी करण्यात आली. याशिवाय, जोरदार घोषणाबाजी करून शासनाच्या मराठी भाषेची गळचेपी करणाऱ्या धोरणांचा तीव्र निषेध केला गेला. यावेळी मनसेचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे (शरद पवार) महानगर अध्यक्ष एजाज मलीक आदींची उपस्थिती होती.