जळगाव : शहरात दररोज मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची केवळ विल्हेवाट न लावता प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी केला जाणार आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या ६० एमएलडी मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते दीपनगर वीज निर्मिती केंद्रापर्यंत पोहचविण्याची योजना सध्या राबविण्यात येत आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करत आहे. प्रकल्पांतर्गत शहरात तीन पंपिंग स्टेशन उभारण्यासह प्रक्रिया केलेले सांडपाणी दीपनगरपर्यंत नेण्यासाठी आवश्यक जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. जळगाव शहरातील सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. प्रक्रिया केलेले पाणी दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वापरले जाणार असल्याने या योजनेमुळे सांडपाण्याचा पुनर्वापर होण्याबरोबरच औष्णिक वीज प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या व्यवस्थेलाही हातभार लागण्याची अपेक्षा आहे.यामुळे जळगाव शहरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासोबतच त्याचा औद्योगिक वापर केला जाणार आहे.

शहरातून भूमिगत जलवाहिनी

प्रक्रिया केलेले सांडपाणी दीपनगरपर्यंत नेण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील विकसित तसेच अविकसित भागातील काही जमिनींच्या खालून वाहिन्या टाकणे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी संबंधित भागातील जमिनींवर प्रवेश करून जलवाहिनी टाकण्याची कामे करण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे जाहीर नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १५५ अन्वये महापालिकेने भोगवटादार व जमीन मालकांना सूचित केले गेले आहे.

जमीनमालकांना महापालिकेची सूचना

जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या जागांवर संबंधित यंत्रणेला प्रवेश करून कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे ज्या भागातून जलवाहिनी जाणार आहे, त्या भागातील भोगवटादार आणि जमीन मालकांना महापालिकेने जाहीर नोटिशीद्वारे माहिती दिली आहे. जलवाहिन्यांचे प्रस्तावित नकाशे जळगाव शहर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आपल्या भागातून जलवाहिनी प्रस्तावित आहे किंवा नाही, याची माहिती नकाशावरून तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीन पंपिंग स्टेशनचीही कामे

६० एमएलडी मलनिस्सारण योजनेत केवळ जलवाहिनीचा समावेश नसून तीन पंपिंग स्टेशनची कामेही प्रस्तावित आहेत. शहरातील सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्याची आणि त्यानंतर प्रक्रिया केलेले पाणी दीपनगरच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था या योजनेतून उभारली जात आहे. जळगाव शहरातील सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा औद्योगिक कारणासाठी पुनर्वापर करण्याचा हा प्रकल्प असल्याने शहराच्या पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे. ६० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी दीपनगर वीज केंद्रासाठी उपलब्ध होणार असल्याने उपलब्ध जलस्रोतांवरील औद्योगिक वापराचा ताण कमी करण्याच्या दृष्टीनेही ही योजना उपयुक्त ठरू शकते.

जळगाव शहर महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी जाहीर केलेल्या नोटिशीत या योजनेसाठी शहराच्या हद्दीत जलवाहिनी टाकण्याची कामे सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर येत्या काळात शहरातील विविध भागांतही जलवाहिनीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. ६० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया करून जलवाहिनीच्या माध्यमातून हे पाणी दीपनगर औष्णिक वीज केंद्रापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. ही व्यवस्था प्रत्यक्षात आल्यानंतर जळगावच्या सांडपाण्याचा औद्योगिक पुनर्वापराचा एक महत्त्वाचा मार्ग खुला होणार आहे.