जळगाव – जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदारांबरोबर त्यांच्या अनेक समर्थक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात नुकताच प्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या काही महत्वाच्या पदांवर नियुक्ती करत असताना, शरद पवार गटाने विशेषतः युवक जिल्हाध्यक्षपदी पुन्हा मराठा समाजाला संधी देत अनेकांना कोड्यात टाकले आहे.
जिल्ह्यातील महायुतीचे घटकपक्ष भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) पक्ष संघटनेला मजबुती देण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवेळी शक्यतो सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उध्द ठाकरे), काँग्रेसनेही त्याच धर्तीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर भर दिलेला असताना, शरद पवार गटाकडून मात्र जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर आता युवक जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पुन्हा मराठा समाजालाच प्राधान्य देण्यात आले आहे.
पक्षाकडून सामाजिक समतोल साधताना इतर पदांवर अन्य समाजाला संधी देण्यात आली असली तरी, प्रमुख पदे ही मराठा समाजाकडेच राहतील, याची काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आहे. शरद पवार गटाचे जळगावमधील यापूर्वीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे होते. परंतु, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासमवेत अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते. त्या पदावर काम करण्याची संधी यावेळी शक्यतो ओबीसी समाजातील तरूण नेतृत्वाला मिळेल, असा अंदाज बांधला जात होता.
प्रत्यक्षात, मराठा समाजातीलच विश्वजीत पाटील यांची युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पाटील हे मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या जामनेर तालुक्याचे रहिवासी असून, यापूर्वीही ते शरद पवार गटात युवक जिल्हा उपाध्यक्षपद सांभाळत होते. त्यांचे वडील डॉ. मनोहर पाटील हे राष्ट्रवादीचे जुने निष्ठावान पदाधिकारी आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते विश्वजित पाटील यांना युवक जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ललित बागूल, प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार राजीव देशमुख, संतोष चौधरी, अरूण पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी स्वागत केले आहे.