जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला जळगाव जिल्ह्यात रविवारी नवी दिशा मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील अमृत महोत्सवी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शरद पवार गटासोबतच अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

शरद पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीची विशेष चर्चा रंगली. पक्षात फूट पडून दोन्ही गट वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांमध्ये असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील संबंध कायम असल्याचे या निमित्ताने दिसून आले. विशेष म्हणजे, यापूर्वी अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतानाही दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये असलेले वैचारिक आणि राजकीय संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत.

‘दोन्ही गटांची विचारधारा एकच’

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी या घडामोडीवर पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण भाष्य केले. दोन्ही पक्ष वेगळे झाले असले तरी आजही त्यांची मूळ विचारधारा एकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचे स्वागतच आहे. दोन्ही गटांची विचारधारा बहुजन हिताची आहे. सध्या ते यूपीएसोबत तर आम्ही एनडीएसोबत आहोत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या दोन्ही गट वेगळ्या मार्गावर असले तरी वैचारिक पातळीवर आमच्यात साम्य आहे, असे प्रमोद पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत स्थानिक पातळीवरही हालचाली होऊ शकतात का, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

‘शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवार यांच्या स्वागतामागील भावना स्पष्ट करताना पक्षांतर्गत भावनिक नाते अधोरेखित केले. शरद पवार आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे विठ्ठल आहेत. त्यामुळे ते जळगाव जिल्ह्यात येत असताना त्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे संजय पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतही सूचक विधान केले. भारतात मंगळग्रह मंदिर केवळ जळगाव जिल्ह्यात असल्याचा उल्लेख करत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासंदर्भात भविष्यात जे काही होईल, ते जळगाव जिल्ह्यातूनच होईल, असे त्यांनी नमूद केले.

खडसेंचा अमृत महोत्सव; राजकीय घडामोड

दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार जळगाव जिल्ह्यात रविवारी सकाळीच दाखल झाले आहेत. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती आधीपासूनच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती. त्यातच विमानतळावर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही शरद पवारांचे स्वागत केल्याने या दौऱ्याला वेगळेच राजकीय परिमाण प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी स्वतंत्र राजकीय भूमिका स्वीकारल्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले जुने संबंध पूर्णपणे तुटलेले नसल्याचे वारंवार दिसून येते.

जळगाव विमानतळावरील रविवारची दृश्ये त्याचेच उदाहरण ठरली. दोन्ही गटांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेली विधाने आणि एकाच ठिकाणी असलेली उपस्थिती यामुळे राष्ट्रवादीच्या संभाव्य एकत्रीकरणाचा विषय पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र, हे एकत्रीकरण प्रत्यक्षात राजकीय पातळीवर कधी आणि कशा स्वरूपात होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे जळगावमधील या घडामोडीकडे आगामी राजकीय समीकरणांची नांदी म्हणून पाहिले जात आहे.