जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात ताफ्यात नव्या सात राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या असून, आता विभागातील या बसेसची संख्या ७० वर पोहोचली आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव आगाराच्या प्रांगणात या बसेसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. नव्या बसेसमुळे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात यापूर्वी ६३ राजमाता जिजाऊ बसेस कार्यरत होत्या. नव्या सात बसेसच्या समावेशानंतर ही संख्या ७० झाली आहे. लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पूजन आणि फीत कापून बसेस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी एसटी ही सामान्य माणसाच्या प्रवासाचा विश्वास असल्याचे सांगितले. गाव लहान असो किंवा रस्ता दुर्गम असो, एसटीची सेवा नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत जळगावच्या एसटी सेवेत विविध बदल झाले असून, इलेक्ट्रिक बसेसनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’च्या नव्या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी आधुनिक बसेसचा पाठपुरावा
राज्यात नवीन बसेस दाखल होत असताना जळगाव जिल्ह्याचा वाटा कमी पडू नये, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्याला आणखी आधुनिक बसेस मिळाव्यात आणि प्रवाशांना वाहनांची कमतरता भासू नये, यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महिला प्रवाशांचा एसटीकडे वाढता कल
एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळाल्यानंतर महिला प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढला असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले. ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव केवळ बसला दिलेले नाव नसून मातृशक्तीचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, याचा संदर्भ देत कुटुंब आणि समाज घडविण्यात आईच्या संस्कारांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
राज्यात सुमारे तीन हजार बसेस
राज्यात सुमारे तीन हजार राजमाता जिजाऊ बसेस टप्प्याटप्प्याने प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव विभागातही नव्या बसेसचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील एसटी वाहतुकीत नव्या बसेसची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘राजमाता जिजाऊ’ बसेसबरोबरच जळगाव विभागात इलेक्ट्रिक बसेसही कार्यरत आहेत. त्यापैकी जळगाव आगारात ३०, तर चोपडा आगारात २० इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत आहेत. नव्या बसेससोबतच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जाही उंचावण्याची गरज पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
स्वच्छता, सुरक्षितता, वेळेचे पालन महत्त्वाचे
बसेसची संख्या आणि सुविधा वाढत असताना स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळेचे पालन यावरही तितकाच भर देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. एसटी महामंडळाची बस असली तरी त्यातून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी आपला माणूस आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षितपणे आणि नियोजित वेळेत त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचविणे ही महामंडळाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता सचिन पवार, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक मयूर पाटील, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, सांख्यिकी अधिकारी रवींद्र पवार उपस्थित होते. प्रास्ताविक विभाग नियंत्रक बोरसे यांनी केले. प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आगार व्यवस्थापक पाटील यांनी आभार मानले.
