जळगाव : भेसळयुक्त कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध कारवाई करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधिताला वर्षभरापूर्वी याच आरोपावरुन बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
सोमनाथ आनंद माळी (३२, रा. भवरखेडा, ता. धरणगाव), असे भेसळयुक्त कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित हा रिफाइंड पामोलीन तेलासह विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करत होता. तसेच तो तयार केलेले भेसळयुक्त दूध चांगल्या दुधामध्ये मिसळून त्यामधील फॅटचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, जनतेच्या जीवाशी खेळ होत असल्याची बाब उघड झाली आहे. त्यानुसार, अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांच्या तक्रारीवरुन माळी याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे जुलै २०२५ मध्येही अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भवरखेडा येथे छापा टाकून संशयित सोमनाथ माळी याच्याविरुद्ध कारवाई केली होती. त्या वेळीही माळीच्या घरातून भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रसायने, उपकरणे आणि साहित्य जप्त करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत माळी याने कृत्रिम दूध तयार करून विक्री करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, यापूर्वी कारवाई होऊनही संशयित माळी याने आपला दूध भेसळीचा गोरखधंदा बंद न करता पुन्हा सुरू ठेवल्याचे समोर आले आहे.
अन्न सुरक्षा विभागाला पुन्हा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने यावेळीही माळीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने, तेल आणि विविध उपकरणे आढळून आली. यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दुधासारख्या अत्यावश्यक अन्न पदार्थात भेसळ करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.
