जळगाव : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यात तापमानाने अचानक उसळी घेतली असून कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता तुलनेने कमी राहिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत होता. मात्र मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमानात सुमारे पाच अंशांनी वाढ झाल्याने उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढली आहे.

दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने शहर व ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात हालचाल असली तरी दुपारी १२ ते चार या वेळेत कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले असून अनेकजण टोपी, रुमाल, गॉगल, स्कार्फ यांचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, थंड पेये, उसाचा रस, लिंबू पाणी, मसाला ताक तसेच आईस्क्रीम विक्रेत्यांकडे गर्दी वाढताना दिसत आहे. उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयांकडे वळत असल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात भर

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण अंशतः ढगाळ राहात असल्याने उष्णते सोबतच उकाडाही जाणवत आहे. सूर्याची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी उष्ण वारे वाहत असून वातावरणात उष्णता साठल्यामुळे संध्याकाळपर्यंत उकाडा कायम राहतो. त्यामुळे नागरिकांना दिवसभर उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला बसताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा तसेच इतर पिकांच्या काढणीची कामे सुरू आहेत.

कडक उन्हामुळे शेतात दिवसभर काम करणे कठीण होत असल्याने शेतकरी व मजूर सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेत काढणीची कामे करत आहेत. दुपारच्या वेळेत शेतातील कामे थांबवून विश्रांती घेण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी मजुरांना उन्हामुळे थकवा, डोकेदुखी व अशक्तपणा जाणवत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि मजूर दोघांनाही वाढत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे.

तापमान आणखी वाढण्याची शक्यता

हवामान विभागाच्या सूत्रांनुसार जळगाव जिल्ह्यात तापमानातील वाढ आता सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढू शकते. विशेषतः १५ मार्चपर्यंत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चच्या मध्यापर्यंत तापमान अधिक वाढून उन्हाळ्याची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. तापमान वाढत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके व सैल कपडे वापरणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाने झपाट्याने वाढ घेतल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून येत्या दिवसांत नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.