जळगाव : महिलांचे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे. आरोग्य विभागाचे सूक्ष्म नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृतीमुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला चांगली गती मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासाठी एकूण ४१,००० मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे २,२९३ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली असून, मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आठ मार्च रोजी जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. नियोजनानुसार ही मोहीम पुढील तीन महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे.

देशभरात महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्राधान्य दिले आहे. ही लस कॅन्सरपासून संरक्षण देण्यासाठी प्रभावी मानली जाते. मात्र, ग्रामीण भागात तसेच काही शहरी भागांमध्ये या लसीबाबत गैरसमज, भीती आणि अपुरी माहिती यामुळे लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण झाली होती.

लसीकरणात अशी मिळाली आघाडी

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आरोग्य यंत्रणेला सक्रिय करत जनजागृतीवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय अधिकारी यांनी गावोगावी भेटी देत पालकांशी संवाद साधला. शाळा व महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. लसीबाबत असलेले गैरसमज दूर करून तिचे महत्त्व पटवून दिल्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि लसीकरण मोहिमेला गती मिळाली.

या समन्वयित प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्हा १,९९९ लसीकरणासह दुसऱ्या क्रमांकावर, तर नागपूर जिल्हा १,२३४ लसीकरणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जळगाव जिल्ह्याची ही आघाडी आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे द्योतक मानली जात आहे.

पालकांना लसीकरणाबाबत आवाहन

या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच संपूर्ण आरोग्य पथकाचे कौतुक केले आहे. पुढील कालावधीत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने आणि प्रभावीपणे मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मते, एचपीव्ही लसीकरणामुळे भविष्यात गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पालकांनी कोणताही संभ्रम न ठेवता आपल्या मुलींना लस देण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेली ही मोहीम केवळ आरोग्यविषयक उपक्रम नसून महिलांच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.