जळगाव : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धसदृश तणावाचा मोठा फटका शहरातील ३१ नागरिकांना  बसला असून, दुबईत अडकून पडल्याने त्यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या शुक्रवारी एका नामांकित विमा कंपनीच्या गौरव समारंभासाठी खान्देशातून दुबईत गेलेल्या ८० जणांपैकी ३१ जण जळगावातील आहेत. सोमवारी रात्री ९:१५ वाजता त्यांचा परतीचा विमान प्रवास नियोजित होता; मात्र, मध्यपूर्वेतील तणावामुळे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आल्याने त्यांचा प्रवास अनिश्चित झाला आहे.

विमा कंपनीच्या विशेष कार्यक्रमानिमित्त शिरपूर, रावेर, पाचोरा, चाळीसगाव तसेच जळगाव शहरातून मिळून ८० जण दुबईत दाखल झाले होते. त्यामध्ये काही जण कुटुंबासह गेले आहेत. सर्वांचा मुक्काम दुबई फेस्टिव्हल सिटी परिसरातील आलिशान हॉटेलमध्ये आहे. हल्ल्याच्या चर्चेत असलेल्या ठिकाणांपासून हा परिसर सुमारे ५० ते ६० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती दुबईतून देण्यात आली. दुबईत असलेले दुर्गेश चौधरी यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले की, “आम्ही सुरक्षित आहोत; मात्र, वातावरण तणावपूर्ण आहे. शहरातअलर्ट जारी करण्यात आला आहे. रस्त्यांवर फारशी वर्दळ नाही. काही भागांत सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री आमचा परतीचा प्रवास होता; परंतु, सध्या विमानसेवा बंद असल्याने पुढील सूचना येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आमच्या गटातील सर्व जण हॉटेलमध्ये एकत्र आहेत.”

पर्यटनाचा आनंद; पण अचानक धक्का

दुबईतील जगप्रसिद्ध वास्तू बुर्ज खलिफा येथे दुर्गेश चौधरी यांच्या गटाने सकाळी भेट दिली होती. त्यानंतर डेझर्ट सफारीसारख्या उपक्रमांचा आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान युद्धजन्य परिस्थितीची माहिती मिळाल्याने सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. नंतर बुर्ज खलिफा संभाव्य लक्ष्य असल्याच्या चर्चा ऐकल्या. सुदैवाने आमचा दौरा त्यापूर्वीच पूर्ण झाला होता, असे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, भारत-दुबई दरम्यान काही इंटरनेट कॉलिंग सेवांवर निर्बंध असल्याने थेट व्हॉट्सॲप कॉलिंग सेवा कार्यरत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पर्यायी ॲप्सद्वारे कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. जळगावातील कुटुंबीय दिवसभर दूरध्वनी व संदेशांच्या प्रतीक्षेत होते. कोणाचे वडील, कोणाचा भाऊ तर कोणाचा पती दुबईत असल्याने नातेवाइकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

प्रशासन व दूतावास सतर्क

मध्यपूर्वेतील घडामोडींवर भारतीय दूतावासाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थिती नियंत्रणात येताच अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हवाई वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर विशेष उड्डाणांची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी दुबईत असलेले सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती मिळत असली, तरी अनिश्चिततेमुळे जळगावातील कुटुंबियांची धडधड वाढली आहे. युद्धजन्य परिस्थिती लवकरात लवकर निवळावी आणि आपल्या आप्तस्वकीयांचा परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा, अशी अपेक्षा नातेवाईक व्यक्त करत आहेत.