जळगाव : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले असतानाच, बुधवारी रात्री पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सलग दोन दिवसांच्या या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक आणि काढणीस आलेले उत्पादन दोन्ही धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.

बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजल्यानंतर जिल्ह्यातील विविध भागांत पावसाला सुरुवात झाली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, भुसावळ तसेच जळगाव शहर या सर्वच भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तासभराहून अधिक काळ मुसळधार सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यांचा वेग प्रचंड असल्याने अनेक गावांमध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडली.

त्यामुळे रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले, तर अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याने ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागली. चाळीसगाव शहरासह पातोंडा, गणेशपूर, पिंप्री परिसरात अवकाळी पावसाने मोठा फटका दिला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

उंबरखेड परिसरात काढणीस आलेली ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके पावसामुळे पूर्णतः भिजून गेली. शेतकऱ्यांनी कष्टाने काढून ठेवलेले उत्पादन शेतातच पाण्यात भिजल्याने खराब झाले. काही शेतांमध्ये तर पाण्याचा साचल्याने पीक सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एरंडोल तालुक्यातील निपाणे, भातखेडे, ताडे, बाह्मणे, गालापूर, आनंदनगर, जवखेडेसिम आणि पिंप्रीसिम या भागांतही रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला.

धरणगाव तालुक्यातील पथराड शिवारात सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक झाडे कोसळून शेती व वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. भडगाव शहरासह तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. गुढे येथे वादळामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होती.

कजगाव आणि वडजी परिसरातही पावसाचा मोठा तडाखा बसला. भुसावळ परिसरात रात्री अकरा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जळगाव शहरात साडेदहा वाजेच्या सुमारास अर्धा ते एक तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

सरसकट नुकसान भरपाईची मागणी

या अवकाळी पावसामुळे गहू, बाजरी, मका, कांदा, हरभरा, ज्वारी यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पावसामुळे आडवी झाली, तर शेतात काढून ठेवलेले उत्पादनही खराब झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झाला असून, शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. नुकसानग्रस्त भागात पिकांचे पंचनामे करण्यात वेळ वाया न घालवता सरसकट नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांना नुकसानग्रस्त भागात पाठवण्यात येत असून, पंचनामे करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.