जळगाव : जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपने अखेर नंदकिशोर महाजन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रावेरचे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अशी ओळख असलेल्या महाजन यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल होणार असून, त्यांच्या उमेदवारीमुळे जळगाव भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे वाढते राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतील विविध पक्ष आणि इच्छुक नेत्यांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली होती. जळगाव जिल्ह्यातील ही जागा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. तर आमदार किशोर पाटील यांचे पुत्र आणि नगरसेवक सुमीत पाटील यांनाही उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दुसरीकडे भाजपमध्येही उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. अनेक इच्छुकांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे संपर्क साधल्याचे बोलले जात होते.
म्हणून नंदकिशोर महाजन उमेदवार
प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, सामाजिक समीकरणे, संघटनातील सक्रियता आणि आगामी स्थानिक निवडणुकांची रणनीती या सर्व बाबी लक्षात घेऊन भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू ठेवली होती. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये अखेर नंदकिशोर महाजन यांनी बाजी मारत उमेदवारी निश्चित केली. नंदकिशोर महाजन हे मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. रावेर तालुक्यात भाजप संघटन उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, पक्षाच्या विविध आंदोलनांपासून निवडणूक व्यवस्थापनापर्यंत त्यांनी सातत्याने जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागात मजबूत संपर्क जाळे निर्माण केले. पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून, संघटनात्मक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला संवाद असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे मानले जात आहे.
इतर इच्छुकांमध्ये नाराजी?
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही उमेदवारी केवळ एका व्यक्तीची निवड नसून जळगाव जिल्ह्यातील भाजपमधील नेतृत्वाची दिशा स्पष्ट करणारा निर्णय आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्ष त्यागानंतर भाजपमध्ये नेतृत्वाचा केंद्रबिंदू पूर्णपणे गिरीश महाजन यांच्या भोवती फिरू लागला. गेल्या काही वर्षांत जिल्हा बँक, बाजार समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध राजकीय नियुक्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव सातत्याने वाढताना दिसला. विधान परिषद उमेदवारीतही त्यांनी आपल्या निकटवर्तीयाच्या नावावर पक्षाला शिक्कामोर्तब करण्यास भाग पाडल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. दरम्यान, भाजपमधील अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांचे नाव देखील संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चेत होते. महिला नेतृत्वाला संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही अन्य इच्छुकांनी देखील पक्षाकडे जोरदार प्रयत्न केले होते. मात्र अखेरीस पक्षाने मंत्री महाजन यांच्या विश्वासातील चेहऱ्यावरच विश्वास दाखवला.
