जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असताना, जळगावची जागा भाजपकडेच कायम राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या जागेवर दावा सांगणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असल्याने महायुतीतील जागा वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जागा वाटपाच्या वाटाघाटींचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविले होते. त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या फॉर्म्युल्यानुसार भाजप १२ जागा, शिवसेना शिंदे गट ३ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ जागा लढवणार असल्याचे समोर आले आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा शनिवारी दुपारी होईल. सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरून महायुतीत मतभेद होते. अखेर संभाजीनगरची जागा भाजपच्या वाट्याला देण्यात आली असून नाशिकची जागा शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, जळगावच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत ही जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुत्र प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी स्वतः पुढाकार घेत पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा केला होता. मात्र, भाजपने जळगावची जागा कायम ठेवत आपली पकड मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे गटामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतही १५ जागांचे वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस ८, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३ जागा लढवणार आहे. पैकी जळगावची जागा ठाकरे गटाकडे गेली आहे.
शिंदे गटाची ठाकरे गटाला मदत होणार?
जळगावमध्ये भाजपकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जागा न मिळाल्याने अस्वस्थ झालेला शिवसेनेचा शिंदे गट निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात तर ऐनवेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष मदत मिळू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे जळगावची विधान परिषद निवडणूक महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय समीकरणांमुळे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील अंतर्गत नाराजीचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
