जळगाव : राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांना अखेर निर्णायक वळण मिळाले असून, जळगावची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट ही जागा लढवणार असल्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या शुक्रवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. आणि त्यात जळगावची जागा ठाकरे गटाकडे गेल्याचे स्पष्ट झाले.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा, बैठका आणि अंतर्गत समन्वय सुरू होता. कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती जागा जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेषतः जळगावमधील विधान परिषद मतदारसंघाबाबत विविध तर्कवितर्क रंगले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्यासारख्या काही नेत्यांकडून या जागेवर दावा सांगितला जात होता. स्थानिक पातळीवर काही इच्छुकांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, अंतिम चर्चेनंतर महाविकास आघाडीने जळगावची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले.

मुंबई येथे शुक्रवारी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. जागावाटपावर जवळपास अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागा वाटपाची अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व १७ विधान परिषद जागा महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असून त्यापैकी १५ जागांबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. उर्वरित दोन जागांबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाणार आहे.

जागावाटपानुसार काँग्रेसला चंद्रपूरसह यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर तसेच नागपूरची जागा देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला रत्नागिरीसह जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या जागा आल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या तीन जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जळगावची जागा ठाकरे गटाला मिळाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट संघटनात्मक पातळीवर सक्रिय झाला असून, ग्रामीण भागातही पक्षाने मोठ्या प्रमाणावर संपर्क मोहीम राबवली आहे. त्यामुळे या जागेवर ठाकरे गटाकडून ताकदीनिशी निवडणूक लढवली जाणार असल्याचे मानले जात आहे. आता या जागेसाठी पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये मात्र या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मागील काही वर्षांत संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही जागा आपल्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना होती. मात्र अंतिम टप्प्यात ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने मात्र या जागावाटपातून एकजूट कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे. लवकरच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही उमेदवार निश्चिती होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.