जळगाव : जिल्ह्यात परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी राजकीय चुरस निर्माण झाली असताना, महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये उमेदवारीवरून काही दिवसांपासून सुरू असलेली रस्सीखेच अखेर भाजपच्या बाजूने झुकल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जळगावची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्यानंतर महायुतीकडून सुरू असलेल्या बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
महायुतीमध्ये जळगावच्या जागेवरून सुरुवातीपासूनच मोठा संघर्ष पाहायला मिळत होता. जिल्ह्यात मोठा भाऊ म्हणून पक्षाची ताकद अधिक असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता, तर शिवसेना शिंदे गटाने देखील आपला हक्क कायम ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. मुंबईपर्यंत झालेल्या बैठका, स्थानिक पातळीवरील चर्चा आणि राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर भाजपच्या उमेदवारालाच हिरवा कंदील मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे शिंदे गटातील काही स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीनेही या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. जळगावमध्ये संघटनात्मक ताकद मर्यादित असली तरी महायुतीला बिनविरोध विजय मिळू न देण्याचा निर्धार विशेषतः ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.
पक्षाचे नेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यासंदर्भात भूमिका मांडताना म्हणाले, की “जळगाव जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे आवश्यक आहे. महायुतीचा उमेदवार बिनविरोध निवडणार नाही, यासाठी ठाकरे गट ही निवडणूक लढणार आहे. ठाकरे गटाकडून निलेश चौधरी आणि शरद तायडे या दोन नावांची जोरदार चर्चा सुरूआहे. दोघांनाही पक्षाकडून तयारीचे संकेत देण्यात आले असून, पैकी निलेश चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद तायडे सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. या दोघांपैकी एका उमेदवाराला अधिकृत ‘एबी फॉर्म’ देण्यात येईल. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असल्यामुळे उमेदवारीबाबत उत्सुकता कायम आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड मानले जात असले तरी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत थेट लढत होणार असून त्याचा राजकीय संदेश राज्यभर जाणार आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. भाजपकडून संभाव्य उमेदवाराच्या नावाबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील समन्वय राखत विजय निश्चित करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.
महायुतीची राजकीय शक्ती परीक्षा
दुसरीकडे, ठाकरे गटाकडून अपक्ष आणि नाराज सदस्यांशी संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत असून उमेदवारी अर्ज, पक्षीय बैठका, नाराजीचे सूर आणि गुप्त राजकीय हालचाली यामुळे सर्वच पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बिनविरोध निवडीचे महायुतीचे स्वप्न धूसर झाल्याने आता ही निवडणूक महायुतीसाठी राजकीय शक्ती परीक्षा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
