जळगाव : शहरातील मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने तब्बल १३ कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश असून, ही कारवाई निवडणूक प्रक्रियेशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.
निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानुसार, गुन्हा क्रमांक १६३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असताना, मतदार यादी प मध्ये मॅपिंग करण्यासह अस्पष्ट छायाचित्र दुरुस्ती तसेच आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. ११ सप्टेंबर २०२५ पासून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लेखी आणि मौखिक सूचनाही देण्यात आल्या होत्या. निवडणूक विभागाच्या बैठका, आढावा सभा आणि पत्रव्यवहारातून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तथापि, वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मतदार यादी पुनर्निरीक्षण हे निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे काम मानले जाते. मतदार यादीतील अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
संबंधितांनी शासकीय आदेशांचे पालन केले नसल्याने लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम ३२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी करत आहेत.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांमध्ये अर्जुन काशीनाथ ठाकरे (शिक्षक- प्रतिभा माध्यमिक विद्यालय), फारूक शाह हानिफ शाह (युनिक- प्राथमिक उर्दू शाळा, मेहरुण), शुभम रमेश गजभिये (लिपीक- मनपा जळगाव), हितेंद्र विलास जोशी (शिक्षक- ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव ), विकास सुकलाल चव्हाण (पद्माबाई बारकू हायस्कूल, सुप्रिम कॉलनी जळगाव), हुसेन सरदार तडवी (मनपा उर्दू शाळा, सुप्रिम कॉलनी जळगाव), मोहंमद परवेज शेख हुसेन (मनपा उर्दू शाळा, सुप्रिम कॉलनी जळगाव), भागवत तुळशीराम महाजन (शारदा माध्यमिक विद्यालय, सुप्रिम कॉलनी जळगाव), कोमल निळकंठ तायडे (लिपिक- शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव), संजय गोपाळ चौधरी (महाराणा प्रताप विद्यालय, प्रेमनगर, जळगाव), कल्पेश गोपाल पवार (लिपिक- मनपा, जळगाव), संजीव नामदार तडवी (शिक्षक- मुंदडा हायस्कूल, जळगाव), कल्पेश यशवंत पाटील (लिपिक- जिल्हा परिषद, जळगाव) यांचा समावेश आहे.
