जळगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र झाली असून, टँकरची संख्या २२ वर गेली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर टँकरची संख्या कमी होण्याची आशा जिल्हा प्रशासन बाळगून होते. प्रत्यक्षात अर्धा जून संपला तरी पाऊस नाही. तापमानाचा पाराही ४० अंशावर कायम असल्याने सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस आटत चालला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेअखेर जळगाव जिल्ह्यातील १० गावांना १६ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. टंचाईवर मात करण्याकरिता ५५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र पाणी संकट गहिरे झाल्याने १५ जूनअखेर टंचाईग्रस्त गावांची संख्या १६ पर्यंत, तर टँकरची संख्या २२ पर्यंत पोहचली आहे.
पैकी खासदार स्मिता वाघ यांच्या अमळनेर तालुक्यात सर्वाधिक आठ गावांना १४ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. त्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात सहा गावांना सहा टँकरद्वारे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ तालुक्यात एक आणि पारोळा तालुक्यातील एका गावात प्रत्येकी टँकर सुरु आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत गावांसाठी ५६ तसेच टँकर भरण्यासाठी ११ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. एकूण सुमारे १,२८,५६५ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे.
टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे
दरम्यान, पावसाळा लांबणीवर पडल्यास जिल्ह्यातील टंचाईची तीव्रता वाढून टँकरची संख्याही वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पावसाला कुठेच सुरुवात नसल्याने बऱ्याच ठिकाणी नद्यांसह शेती शिवारातील नाले कोरडेठाक पडले आहेत. अनेक भागांत विहिरींसह कूपनलिकांची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. नैसर्गिक पाणीस्रोत आटण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागले आहे. काही ठिकाणी आठ ते दहा दिवसानंतरही पाणी मिळेनासे झाले आहे.
टंचाईचा फटका जनावरांनाही बसला आहे. पाण्याच्या वाढत्या गरजेनुसार जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली असली, तरी नव्याने टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्या वाढतच आहे. संबंधित ग्रामपंचायतींना पाणी साठवणूक, वितरण आणि वापर व्यवस्थापनाचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्याच्या जलसंपदा विभागाचे नेतृत्व करणारे मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील हे दोघेही जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असतानाच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील जलव्यवस्थापन आणि पाणीपुरवठा धोरणांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका असलेल्या या दोन मंत्र्यांच्या जिल्ह्यातच नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पावसाळा सुरू होण्याचा कालावधी उलटून गेला असतानाही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी धरणांमधील उपलब्ध साठा, लघु सिंचन प्रकल्प, विहिरी, कूपनलिका आणि नैसर्गिक जलस्रोत यांवरील ताण वाढत चालला आहे. भूजल पुनर्भरण आणि जलजीवन मिशनमधून दीर्घकालीन पाणी नियोजनाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी कितपत झाली, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
