जळगाव – मे महिन्याच्या प्रारंभापर्यंत केवळ एका गावात टंचाई जाणवणाऱ्या जिल्ह्यात जून महिन्यातही उन्हाच्या झळा कायम असल्याने १८ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गावांमध्ये टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आगामी काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विहिरी, नद्या, बंधारे आणि धरणांमधील जलपातळी खालावली असून, नैसर्गिक पाणीस्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ही स्थिती केवळ नागरिकांपुरती मर्यादित न राहता जनावरांच्या पाण्याच्या गरजेवरही परिणाम करत आहे. पाण्याच्या वाढत्या गरजेनुसार जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली असून, नव्याने संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार केली जात आहे. संबंधित ग्रामपंचायतींना पाणी साठवणूक, वितरण आणि वापर व्यवस्थापनाचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यःस्थितीत अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक, तरवाडे, सबगव्हाण, जानवे, जामनेर तालुक्यातील वाडी किल्ला, वाकोद, भुसावळ तालुक्यातील कंडारी, कुऱ्हे महादेव माळ, पाचोरा तालुक्यातील लोहारा, पारोळा तालुक्यातील सुमठाणे, चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, विसापूर तांडा, भील्ल वस्ती, कृष्णानगर, रोहिणी, राजदेहरे गावठाण तांडा, अंधारी, हातले, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, या गावांना टँकरद्वारा पाणी पुरविले जात आहे.