जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने उष्ण आणि दमट वातावरणात वाढ झाली आहे. सुदैवाने खरीप पिकांना पावसाची प्रतीक्षा असतानाच सोमवारी (ता. २०) जिल्ह्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
हवामान विभागाने जळगावसह राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी मेघगर्जना आणि विजांचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर थांबणे टाळावे, झाडाखाली आश्रय घेऊ नये आणि शेतीची कामे शक्यतो सुरक्षित वेळेत पूर्ण करावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
खरीप पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मूग तसेच केळीसह विविध खरीप पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने अनेक भागांतील जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत अपेक्षित हलका ते मध्यम पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरणार असून, जमिनीतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होईल. मात्र जिल्ह्यातील अनेक भागांना अजूनही दमदार आणि व्यापक पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पुढील हवामानाच्या घडामोडींवर खिळल्या आहेत.
मान्सूनची प्रणाली सक्रिय
सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील श्रीगंगानगरपासून रोहतक, हरदोई, वाराणसी, रांची मार्गे वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला असून तो सक्रिय आहे. याशिवाय उत्तर झारखंड व बिहार, नैर्ऋत्य मध्य प्रदेश तसेच उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि दक्षिण छत्तीसगड परिसरात विविध उंचींवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, त्याचा परिणाम राज्यातील विविध भागांतील स्थानिक पावसावर होत आहे.
खबरदारी घेण्याचे आवाहन
मेघगर्जना आणि विजांचा इशारा लक्षात घेता शेतकरी तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज तपासूनच शेतीची कामे नियोजित करावीत. विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणे, सिंचनासाठी विद्युत पंप सुरू करणे किंवा उघड्या शेतात थांबणे टाळावे. तसेच एकाकी झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा उंच ठिकाणी आश्रय घेऊ नये. सुरक्षित इमारतीत किंवा बंदिस्त ठिकाणी थांबावे. मुसळधार सरी सुरू झाल्यास नाले, ओढे किंवा पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. हवामानातील बदलांवर सतत लक्ष ठेवून अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच वीज व पावसाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
