जळगाव : शासनाच्या योजनेतून शेतात सोलर सिस्टीम बसविण्यासाठी सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा (ता. यावल) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शैलेश अंकुश झोटे (३८, रा. रावेर, जि. जळगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार शेतकऱ्याने आपल्या शेतात कूपनलिका केली आहे. शासनाच्या योजनेतून या कूपनलिकेवर सोलर सिस्टीम बसविण्यासाठी शेतीच्या सातबारा उताऱ्यावर कूपनलिका असल्याची नोंद असणे आवश्यक होती. ही नोंद करून घेण्यासाठी तक्रारदार शेतकरी आमोदा येथील तलाठी शैलेश झोटे यांच्याकडे गेले होते. त्यावेळी संबंधित तलाठ्याने सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्यासाठी सुमारे ४००० रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने नाईलाजास्तव यापूर्वी सुमारे ३५०० रुपये रोख स्वरूपात तलाठ्याला दिले होते. मात्र, त्यानंतरही सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने २ ऑक्टोबर रोजी तक्रारदार तलाठ्याकडे आपल्या कामाची विचारपूस करण्यासाठी गेले. त्यावेळी तलाठी झोटे यांनी सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्यासाठी ५०० रुपये आणि सदर नोंदीचा सातबारा उतारा देण्यासाठी आणखी ५०० रुपये, अशी एकूण एक हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने मंगळवारी आमोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात पंचांसमक्ष कारवाई केली. यावेळी तलाठी झोटे यांनी यापूर्वी ३५०० रुपये घेतल्याचे मान्य केले. तसेच उर्वरित एक हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे पडताळणीत समोर आले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी शैलेश झोटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कारवाईनंतर त्यास ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित तलाठ्याला अटक करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकातील सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर आणि मनोज पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.
