जळगाव : जिल्ह्यातील डांभुर्णी (ता. यावल) येथे बियर बारचा मालक असलेल्या कोळन्हावीच्या सरपंचाने देशी बनावटीच्या कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने गुरुवारी रात्री खळबळ उडाली. सरपंचाने बियर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या कारणावरून दोन तरुणांशी वाद झाल्यानंतर त्यांना धाक दाखविण्याच्या उद्देशाने हवेत गोळी झाडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी रात्रीपासून तपासाची चक्रे फिरवून शुक्रवारी पहाटेच संशयिताला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गोळीबारानंतरची एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. डांभुर्णी येथील ही घटना यावल पोलीस ठाण्यापासून सुमारे १९ किलोमीटर अंतरावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विकास सोलंके हा कोळन्हावी गावाचा सरपंच असून बियर बारचा मालकही आहे. गुरुवारी रात्री त्याच्या मालकीच्या बियर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ त्याच गावातील दोन तरुणांनी रेकॉर्ड केला. यावरून त्यांचा सोलंके याच्याशी वाद झाला.
वाद वाढल्यानंतर संबंधित तरुणांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने सोलंके याने देशी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. घटनेच्या वेळी संशयित मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
गोळीबाराची माहिती मिळताच यावल पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. रात्रीपासून त्याचा माग काढत पोलीस पथकाने पहाटे त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस तसेच गोळीबारात वापरलेली रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, पथकाने आवश्यक फॉरेन्सिक कार्यवाही पूर्ण केली आहे.
तपासादरम्यान संशयित सरपंचाने त्याच्याकडील देशी बनावटीचा कट्टा सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा कट्टा त्याच्यापर्यंत नेमका कसा पोहोचला, तो कोणाकडून घेतला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील मागील दुवा तपासात महत्त्वाचा ठरणार आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ तसेच शस्त्र कायद्याच्या कलम ३/२५ आणि ५/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेनंतर गावात सध्या शांतता असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
