जळगाव : जिल्ह्यातील यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शासकीय मुलांच्या वसतिगृहातील कंत्राटी काम न मिळाल्याच्या कारणावरून दोन जणांनी कार्यालयात येऊन प्रभारी सहायक प्रकल्प अधिकाऱ्याशी वाद घालत त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील उर्फ संजय हमीद तडवी आणि रोहन साहील तडवी (रा. फैजपूर, ता. यावल) हे शुक्रवारी दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आले. त्यांनी प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी जावेद इस्माईल तडवी यांना शासकीय मुलांच्या वसतिगृहातील भोजन, भंगार व साफसफाईची कंत्राटे मिळत नसल्याचा आरोप करत जाब विचारण्यास सुरुवात केली. प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट साहील तडवी याने संतापाच्या भरात अधिकाऱ्यांची कॉलर पकडून मोठ्याने आरडाओरड केली. शिवीगाळ करत धमकावल्याने कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळामुळे शासकीय कामकाजही विस्कळीत झाले.
कर्मचाऱ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यालयात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) अनिल बडगुजर यांनी यावल पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढत तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दोघांविरुद्ध गुन्हा; तपास सुरू
प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी जावेद इस्माईल तडवी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांनी साहील उर्फ संजय हमीद तडवी आणि रोहन साहील तडवी या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकाऱ्याला धमकावणे, शिवीगाळ करणे आदी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहेत.
अटक न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा
या घटनेनंतर शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, आदिवासी एकता मंच आणि आदिवासी कर्मचारी संघटनेने संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे पदाधिकारी मनीष तडवी यांनी सांगितले की, आरोपींना त्वरित अटक न झाल्यास सोमवारपासून जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे या प्रकरणामुळे प्रशासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
