जळगाव : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. या कारवाईनंतर त्यांच्या घराची आणि बँकेतील लॉकरची झडती घेतली असता तब्बल पाच कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. यामध्ये लाखोंची रोख रक्कम, दोन घरे, कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सतीश मन्सुलाल शिसोदे (५५, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, आदर्शनगर, जळगाव) हे जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दोन नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई केली होती. यावेळी सहकारी अभियंत्यासह १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांना पकडण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने शिसोदे यांना पाच नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोख रकमेसह दोन घरे

लाच प्रकरणातील कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शिसोदे यांच्या निवासस्थानी झडती घेतली. या झडतीत सात लाख ९७ हजार ९२० रुपये रोख रक्कम आढळून आली. याशिवाय आदर्शनगर परिसरातील त्यांच्या मालकीच्या दोन घरांची माहिती समोर आली. पहिल्या घराची किंमत ४५ लाख रुपये, तर दुसऱ्या घराची किंमत ६५ लाख रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर मौल्यवान वस्तूंची अंदाजित किंमत २४ लाख ३९ रुपये आहे. अशा प्रकारे केवळ घरझडतीत एक कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

बँक लॉकरमध्ये कोट्यवधींचे सोने

शिसोदे यांच्या जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने आढळून आले. यामध्ये २५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, पट्ट्या, चैन, पेंडल, लॉकेट आणि बांगड्यांचा समावेश आहे. या सोन्याची किंमत तीन कोटी ५१ लाख ८९ हजार १५३ रुपये इतकी आहे. तसेच लॉकरमध्ये ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू आणि दागिने आढळले. यामध्ये चांदीची बिस्किटे, वाट्या, ताटे आणि इतर वस्तूंचा समावेश असून, त्यांची किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये आहे. याशिवाय १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही मिळून आले. त्यांची किंमत तीन लाख ५५ हजार २८६ रुपये आहे. बँक लॉकरमधील या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत तीन कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये इतकी आहे.

मालमत्ता पाच कोटी १६ लाखांवर

घरझडती आणि बँक लॉकरच्या तपासणीत मिळालेला सर्व मुद्देमाल एकत्रित केल्यानंतर त्याची किंमत पाच कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये इतकी झाली आहे. अवघ्या दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी झालेल्या कारवाईनंतर अधिकाऱ्याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये कोट्यवधींची मालमत्ता आढळल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या मालमत्तेच्या स्रोताबाबत पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लॉकर तपासणी पथकात पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह सुरेश पाटील, किशोर महाजन, संगिता पवार, राकेश दुसाने आणि सचिन चाटे यांनी सहभाग घेतला. तर घरझडती पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सुनील वानखेडे आणि मनोज पाटील यांनी काम पाहिले.