जळगाव : जिल्हा परिषदेत अपंग कोट्यातून शासकीय नोकरी मिळवण्यासाठी कथितरीत्या बोगस अथवा चुकीच्या प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने अपंग कर्मचाऱ्यांची पुनर्तपासणी सुरू केली असून, तपासणीत आढळलेल्या तफावतींच्या आधारे संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी केली जात आहे. या प्रक्रियेमुळे असंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवास्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपंग कोट्यातून शासकीय सेवेत नियुक्तीसाठी नियमानुसार किमान ४० टक्के अपंगत्व आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पथकांमार्फत पुनर्तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांमध्ये सद्यःस्थितीत ७१३ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी २६३ अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पुनर्तपासणीत मोठी तफावत
दरम्यान, पुनर्तपासणीदरम्यान २११ कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरील टक्केवारी आणि नव्याने झालेल्या वैद्यकीय तपासणीतील निष्कर्ष यामध्ये तफावत आढळल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे तब्बल ७२ कर्मचाऱ्यांचे अपंगत्व १० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
नोकरीसाठी प्रमाणपत्रात फेरफार?
अपंगत्वाची वास्तविक टक्केवारी कमी असतानाही अधिक टक्केवारीचे प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी किंवा सेवा सवलतीचा लाभ घेतला का, याची चौकशी आता प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र, केवळ पुनर्तपासणीत तफावत आढळली म्हणून संबंधित कर्मचारी दोषी ठरतात असे नाही. प्रमाणपत्र कोणत्या वैद्यकीय प्राधिकरणाने दिले, त्यावेळी करण्यात आलेली वैद्यकीय तपासणी, प्रमाणपत्रातील नोंदी आणि सध्याच्या तपासणीतील निष्कर्ष यांची पडताळणी केल्यानंतरच अंतिम जबाबदारी निश्चित होणार आहे.
विभागीय चौकशीला सुरुवात
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनासह सेवेतून बडतर्फीपर्यंतची कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खऱ्या अपंगांच्या हक्कांचा प्रश्न
जिल्हा परिषदेतील घोटाळ्यानंतर अपंग कोट्यातील नियुक्त्या आणि सवलतींच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खऱ्या अर्थाने अपंग असलेल्या आणि शासनाच्या सवलतींसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या हक्कांवर कथित बोगस प्रमाणपत्रांमुळे गदा येत असल्याचा आरोप अपंगांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लक्ष
दरम्यान, पुनर्तपासणीत तफावत आढळलेल्या कर्मचाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन नियमानुसार चौकशी पूर्ण केली जाणार आहे. चौकशीचा अंतिम अहवाल आणि त्यानंतर घेतला जाणारा निर्णय यावर या संपूर्ण प्रकरणाची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे संबंधिक कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि दोष निश्चित झाल्यानंतर कोणती कारवाई केली जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
