जळगाव : जिल्ह्यातील जामनेर शहरात गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेत अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि नव्या नियमांमुळे मोठा गोंधळ उडाला. सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर जोरदार निदर्शने करत भुसावळ–छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भारत गॅस कंपनीने अलीकडेच सिलिंडर वितरणाबाबत नवीन धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार गॅस एजन्सींना थेट बुकिंग स्वीकारण्याचे अधिकार काढून घेण्यात आले असून, ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच बुकिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बुकिंगनंतर मिळणाऱ्या ओटीपीशिवाय सिलिंडर देण्यात येणार नाही, अशी अट लागू करण्यात आली आहे. मात्र, या बदलाची पुरेशी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचली नसल्याने जामनेरमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. सकाळपासूनच गॅस एजन्सीवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक ग्राहकांनी प्रत्यक्ष एजन्सीवर जाऊन सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र ऑनलाइन बुकिंग आणि ओटीपी प्रक्रियेमुळे त्यांना सिलिंडर मिळू शकले नाही. तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर न मिळाल्याने नागरिकांचा संयम सुटला.

नागरिकांची तीव्र नाराजी

या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी एजन्सीसमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आणि पुढे जाऊन भुसावळ–छत्रपती संभाजीनगर मार्गावर रिकामे गॅस सिलिंडर रस्त्यावर आडवे टाकून रास्ता रोको केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. प्रसंगी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. नव्या नियमांनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना बुकिंगनंतर ४५ दिवसांनी तर शहरी भागातील ग्राहकांना २५ दिवसांनी सिलिंडर मिळणार असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये अधिकच संताप पसरला. घरात गॅस संपलेला असताना इतके दिवस वाट कशी पाहायची?, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तसेच तांत्रिक यंत्रणा सक्षम नसताना असे नियम लागू केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पोलिसांनी मोठा बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि पुरवठा विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पुरवठा अधिकारी नारायण सुर्वे यांनी नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती स्पष्ट केली. एजन्सीकडे गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून केवळ तांत्रिक अडचणींमुळे वितरणात अडथळे निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. नोंदणीकृत मोबाईलवरून नियमानुसार बुकिंग केल्यास सर्व ग्राहकांना सिलिंडर मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. तरीही नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर आणि माहितीअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून सिलिंडर वितरण सुरळीत करण्याची आणि नव्या नियमांबाबत स्पष्ट मार्गदर्शन देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.