जळगाव : जिल्ह्यातील जामनेर येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. निष्काळजीपणा तसेच पुरेशा सुरक्षेअभावी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ आणि संतापही व्यक्त होत आहे.
उत्कर्ष गणेश पाटील, असे मृत मुलाचे नाव आहे. उत्कर्ष हा त्याचे वडील गणेश पाटील यांच्यासोबत प्रथमच पोहण्यासाठी जामनेर नगर परिषदेच्या स्विमिंग पूलवर गेला होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पूल परिसरात नेहमीप्रमाणेच गर्दी होती. पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर वडिलांनी उत्कर्षला पूलाच्या काठावर उभे करून त्याचे वेगवेगळ्या पोजमध्ये छायाचित्र काढले. मात्र, आनंदाच्या क्षणांचे ते छायाचित्रण काही क्षणांतच दुःखद आठवणीत बदलले. छायाचित्र काढून झाल्यानंतर गणेश पाटील ओले कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेले. यावेळी उत्कर्ष काही काळ एकटाच स्विमिंग पूल परिसरात उभा होता. मिळालेल्या माहितीनुसार, खेळता खेळता तो पूलाच्या आउटलेटसाठी तयार करण्यात आलेल्या खोल चेंबरजवळ गेला. या चेंबरवर योग्य झाकण किंवा सुरक्षा उपाय नसल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यात तो पडून बुडाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, कपडे बदलून बाहेर आल्यानंतर गणेश पाटील यांना उत्कर्ष जागेवर दिसला नाही. त्यांनी तत्काळ परिसरात शोध सुरू केला. उपस्थित नागरिकांनीही शोध मोहीम राबवली. काही वेळानंतर उत्कर्ष हा चेंबरमध्ये आढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पूल परिसरात मोठी गर्दी जमली होती. पालक आणि नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली. वर्षभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने स्विमिंग पूल व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
विशेषतः लहान मुलांसाठी आवश्यक असलेली देखरेख, लाइफगार्डची उपस्थिती, धोकादायक ठिकाणांची सुरक्षितता आणि योग्य संरक्षक व्यवस्था यांचा अभाव अधोरेखित झाला आहे. स्थानिक नागरिकांनी पूल परिसरात अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्लॅब कोसळून मुलाचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत यावल शहरातील १० वर्षीय मुलाचा क्रिक्रेट खेळताना अंगावर स्लॅब कोसळून मृत्यू झाला. रणवीर जगदीश गायकवाड असे मृत मुलाचे नाव आहे.स्लॅब कोसळल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या जगदीशला तातडीने भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रणवीर रविवारी सायंकाळी त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर क्रिक्रेट खेळत होता. यावेळी जीर्ण झालेल्या घराच्या पोर्चचा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आजुबाजूच्या नागरिकांनी घडलेली घटना लक्षात आल्यानंतर रणवीरला तातडीने भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याठिकाणी त्याचा उपचार सुरु असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. चार वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतरही ही घटना घडल्याने गायकवाड कुटुंबावर दुखाचा मोठा आघात झाला.
