धुळे : उत्तर महाराष्ट्र हा महायुतीचा भक्कम बालेकिल्ला असून आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच नव्हे, तर ३५ वर्षात पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला एकतर्फी विजय मिळेल, असा ठाम विश्वास राज्याचे पर्यटन व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज व्यक्त केला.

मंत्री जयकुमार रावल यांनी आज दोंडाईचा येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. भाजप ही केवळ निवडणुका लागल्या की प्रचार सुरू करणारी संघटना नसून वर्षभर कार्यरत राहणारी पक्षयंत्रणा आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते हे सैनिकांप्रमाणे सदैव सज्ज राहतात, असे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षात दररोज, आठवड्याला आणि महिन्याला सातत्याने संघटनात्मक नियोजन, प्रशिक्षण आणि संवाद प्रक्रिया राबविली जाते. प्रत्येक विभागात जबाबदाऱ्या निश्चित करून भक्कम संघटनाची उभारणी केली जाते. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, तयारी आणि जनसंपर्क मजबूत होतो.

अलिकडेच बिहारमध्ये महायुतीला मिळालेले यश हे सातत्यपूर्ण मेहनत, नियोजन आणि संघटनशक्तीचे द्योतक असल्याचे रावल यांनी नमूद केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मजबूत रणनीती आखण्यात आली असून, आगामी निवडणुकांमध्ये ऐतिहासिक यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जनकल्याणकारी कामांमुळे भाजपावर सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. लोकसभेतील काही ठिकाणी भ्रम निर्माण झाला होता, परंतु आता जनता सजग झाली आहे. विकास, पारदर्शकता आणि सुशासन या मुद्द्यांवर मतदार पुन्हा एकवटत असल्याचे रावल म्हणाले. महायुतीच्या कारभारात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, जलसंधारण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील कामांचा वेग वाढला असून त्याचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचतो आहे असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेचा उल्लेख करत रावल यांनी सांगितले की, गेल्या ३५ वर्षांपासून एका पक्षाचे वर्चस्व असलेली संरचना आगामी निवडणुकांत बदलणार आहे. महायुतीची मजबूत संघटनात्मक तयारी आणि जनसंपर्कामुळे मुंबई महापालिकेतही परिवर्तन घडेल असा ठाम दावा त्यांनी यावेळी केला. राज्यातील प्रत्येक शहर, तालुका आणि विभागात भाजपाची मजबूत यंत्रणा उभारण्यात आली असून कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि लोकाभिमुख योजनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर जनता विकासाच्या बाजूने ठामपणे उभी राहत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट आणि निर्णायक आघाडी मिळणार असल्याचा ठाम विश्वास पालकमंत्री रावल यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुका सुशासन, स्थिर नेतृत्व आणि पारदर्शक विकासाचे नवे पर्व सुरू करतील, असेही त्यांनी नमूद केले.