शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावातील असुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच जयेश नवले (१२) याचा बुडून मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिल परिसरातील साने गुरुजी सोसायटीत राहणारा जयेश हा कानोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. शनिवारी सकाळी सहा वाजता तो मित्रांसोबत पोहण्याचा सराव करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येथे गेला. मित्रांसोबत तो तलावात उतरला. परंतु, आठ फूट पाणी असलेल्या तलावात सूर मारताना जयेशला दम लागला. जयेश गटांगळ्या खात असल्याचे लक्षात येताच तलावात सराव करणाऱ्या इतरांनी त्यास त्वरित बाहेर काढले. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याची शुद्ध हरपली होती. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयेश अत्यवस्थ असल्याने साडेआठच्या सुमारास त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून जयेश यास मृत घोषित केले. पोलीस ठाण्यात त्यासंदर्भात नोंद करण्यात आली आहे. जयेश हा माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन नवले यांचा नातू तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक शीतलकुमार नवले यांचा एकुलता एक मुलगा होय. सकाळी ११ वाजेच्या सुमारास जयेशचे पार्थिव विच्छेदनानंतर नवले कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.