सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेला एक टक्का अबकारी कर रद्द करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक सराफ संघटनेतर्फे बुधवारी सराफ व्यावसायिकांनी कुटुंबातील सदस्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. उपरोक्त परिसरात आधीच किसान सभेच्या शेतकऱ्यांनी ठिय्या दिल्यामुळे आणि परिसरात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाल्यामुळे मेहेर चौकातून आंदोलकांना माघारी फिरावे लागले.
किसान सभेच्या आंदोलनामुळे वाहतुकीचा आधीच बोजबारा उडाला असताना सराफ व्यावसायिकांच्या मोर्चाने त्यात आणखी भर पाडली. जिल्ह्यात सराफ व्यावसायिकांमार्फत महिनाभरापासून संप सुरू असून विविध माध्यमातून सरकारच्या धोरणांचा निषेध केला जात आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुधवारी सराफ व्यावसायिकांनी महामोर्चाचे आयोजन केले होते. बी. डी. भालेकर मैदानापासून सुरू झालेल्या मोर्चात सुवर्णकार कुटुंब व कर्मचाऱ्यांसह सहभागी झाले. केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत मोर्चा महात्मा गांधी रोडमार्गे मेहेर चौकात पोहोचला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील मार्ग किसान सभेच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आला आहे. यामुळे सराफ व्यावसायिकांना मेहेर चौकातून माघारी फिरावे लागले. संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सुवर्णकारांवर अन्याय केला असून तयार दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लादण्यात आला आहे. २०१२-१३ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीदेखील उत्पादन शुल्क लागू केले होते. मात्र त्यास तेव्हा व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत विरोध दर्शविला.
अखेरीस सुवर्णकारांची बाजू पटल्यावर उत्पादन कर मागे घेण्यात आला. त्यावेळी झालेल्या आंदोलनास भाजप व त्यांच्या सहकारी पक्षाने पाठिंबा दिला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर व्यावसायिकांना जाचक ठरणारा कर कसा लादला, असा प्रश्न संघटनेने केला. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी या करामुळे व्यावसायिकांना त्रास होणार आहे. पंतप्रधानांनी सातत्याने ‘इन्स्पेक्टर राज’ कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या निर्णयामुळे त्यातच वाढ होईल, याकडे लक्ष वेधले.
सराफ संघटनेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे महात्मा गांधी रस्त्यावर वाहतुकीची पुरती वाट लागली.
राज्यात अबकरी कराविरोधात मोठय़ा प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आले आहे. या वेळी सरकारने सराफांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसी बळाचा वापरही केला आहे. मुंबई शेजारील परिसरात दोन दिवसांपूर्वी सराफांचे आंदोलने झाली. या वेळी पोलिसांनी महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केला.